हल्लेखोर वाघांना पकडल्यानंतर ठेवायचे कुठे; चंद्रपुरातील वाढत्या संघर्षामागे अजूनही वनविभाग निरुत्तर

चंद्रपुरात ब्रह्मपुरी येथे गेल्या तीन दिवसांपासून तोरगाव येथे वाघाच्या हल्ल्यात दोन माणसांचा बळी गेल्यानंतर रविवारी वनविभागाने हल्लेखोर वाघाला जेरबंद केले. दोन्ही हल्ल्याच्या ठिकाणी वावर असलेल्या पी-१ या अडीच वर्षांच्या वाघीणीला दुपारी साडे तीनच्या सुमारास तळेगाव येथील शेतात बेशुद्ध करुन जेरबंद केले गेले. आता चंद्रपुरातील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमधील वाघांची संख्या ४ वर पोहोचली आहेत. वाघांना सेंटरमध्ये ठेवण्यास जागेचा अभाव असताना चारपैकी दोन वाघ आता लवकरच बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाठवले जातील. गोरेवाड्यातील उरलेल्या दोन वाघांना पाठवायचे की इतर राज्यांतील प्राणिसंग्रहालयात याबाबतचा निर्णय मंत्रालयीन पातळीवर चर्चा झाल्यानंतर घेतला जाईल, अशी माहिती वनविभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक महिप गुप्ता यांनी दिली.

वाघांना पिंज-यात बंदिस्त करुन ठेवण्यासाठी पिंजरे अपुरे

डिसेंबर महिन्यापासून चंद्रपूरात चार वाघ पकडण्यात आले आहेत. रविवारी पी१ या वाघीणीला पकडण्यासाठी वन विभागावर मोठ्या प्रमाणात दबाव आला होता. चंद्रपुरातील वाढते वाघांचे हल्ले पाहता लोकांमध्ये आता वनविभागाविरोधात मोठा संघर्ष उभा राहिला आहे. मृतदेह सरकारच्या ताब्यात न देणे, वनविभागावर मोर्चे काढण्याचा प्रकार स्थानिकांनी सुरु केला आहे. वाघ पकडण्यासाठी वनविभागावर दबाव वाढत असला तरीही वाघांना पिंज-यात बंदिस्त करुन ठेवण्यासाठी पिंजरे अपुरे पडत आहेत. पटना प्राणिसंग्रहालयाने राज्याकडे वाघांची मागणी केली आहे. राज्य सरकार तसेच केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडून परवानगी मिळाल्यानंतर वाघ राज्याबाहेर पाठवता येतील. पिंज-यांची जागा अपुरी असली तरीही काही हल्लेखोर वाघ पकडल्यानंतर नागपूर येथील गोरेवाडा प्राणिसंग्रहालयातच पाठवले जातील, अशी माहिती गुप्ता यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here