तब्बल १३ माणसांचा बळी घेणारा अंदाजे सहा वर्षांच्या सीटी १ वाघाला गुरुवारी सकाळी जेरबंद करण्यात वनाधिका-यांना यश आले. सीटी १ या वाघाने भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात आतापर्यंत १३ माणसांचा बळी घेतला आहे. सीटी १ वाघ माणसांवर हल्ला केल्यानंतर संबंधित प्रदेश सोडत असल्याने त्याला पकडणे वनाधिका-यांसाठी मोठे आव्हान ठरले होते. अखेर बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास गडचिरोलीतील वडसा येथील एकलपूर येथून बेशुद्ध करुन वनाधिका-यांनी जेरबंद केले. सीटी १ वाघाला ठार करण्याची मागणही स्थानिक राजकीय नेत्यांकडून होऊ लागली होती. देशात पहिल्यांदा वाघाच्या शोधासाठी थर्मल ड्रोनचा वापर करण्यात आल्याची नोंद सीटी १ वाघाच्या शोधमोहिमेत झाली.
सीटी १ हा वाघ पहिल्यांदा ताडोबा येथील बफर क्षेत्रातील चिमूर येथे पहिल्यांदा आढळून आला. त्यामुळे वाघाला सीटी १ म्हजेच चिमूर टायगर १ असे नाव पडले. जंगलात जाणा-या तब्बल १३ माणसांवर वाघाने हल्ला करुन त्यांना ठार केले. सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्याच्या सुरुवातीला भंडारा जिल्ह्यातील लांखानदूर येथे एका माणसाला सीटी १ ने ठार केले, नंतर सीटी १ गडचिरोलीतील वडसा येथे पोहोचला. तेव्हापासून वनाधिका-यांची टीम वाढवली गेली.
(हेही वाचा –MSRTC: एसटी महामंडळाचे ‘ते’ 118 कर्मचारी पुन्हा सेवेत रुजू)
नवेगाव नागझिरा, ताडोबा यांच्यासह मेळघाट येथील वन्यप्राणी बचाव पथकही त्याच्या मागावर होते. ऑक्टोबर महिन्यापासून ५० वनाधिका-यांची टीम सीटी १ च्या शोधात होती. भंडारा. गडचिरोली, चंद्रपूर आणि गोदिंया जिल्ह्यातील वनाधिकारी त्याच्या शोधावर होते. सततच्या पावसाने झुडुपांची मोठी वाढ झाल्याने सीटी १ ला जंगलात लपून राहणे सोयीचे ठरत होते. सप्टेंबर महिन्याच्या अखेरिपासून सीटी १ गडचिरोलीतील वडसा येथेच होता. परंतु गुरुवारपासून तो अचानक गायब झाला.
शुक्रवारी आणि सोमवारी आरमोरी येथील दोन वेगवेगळ्या भागांत माणसांवर वाघाचा हल्ला झाला. त्यापैकी सोमवारच्या घटनेत सीटी १ चाच हात असल्याचा दाट संशय वनाधिका-यांना होता. अखेरीस बुधवारी सकाळी तो वनाधिका-यांना सापडला. त्याला गोरेवाडा प्राणिसंग्रहालयात हलवण्यात येत असल्याची माहिती गडचिरोली वनविभाग (प्रादेशिक)चे मुख्य वनसंरक्षक किशोर माणकर यांनी दिली.
Join Our WhatsApp Community