दहावीच्या निकालाबाबत शिक्षकांमध्येच संभ्रम! निकाल अंदाजे लावणार?  

शिक्षणमंत्र्यांच्या निर्णयावर जर अंमल करायचा असेल, तर दहावीचा निकाल अंदाजे लावावा लागणार आहे. शिक्षणमंत्र्यांनी मनमानीपणा केला आहे, असे शिक्षकांचे म्हणणे आहे.

84

राज्य सरकारने १०वीची परीक्षा रद्द केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला चांगलेच खडसावले होते. त्यामुळे राज्य सरकार फेरविचार करेल, असे वाटत होते, परंतु शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड निर्णयावर ठाम राहिल्या, तसेच निकालासाठी ‘५०:३०:२०’ फॉर्म्युला ठरवला. हा निर्णय घेताना शिक्षणमंत्री गायकवाड यांनी ‘आपण शिक्षक, पालक यांच्याशी चर्चा केली आहे’, असे सांगितले. परंतु प्रत्यक्षात शिक्षणमंत्र्यांनी याविषयी कुणाशी चर्चा केली नाही, असे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. आता शिक्षणमंत्र्यांच्या निर्णयावर जर अंमल करायचा असेल, तर दहावीचा निकाल अंदाजे लावावा लागणार आहे. हा निर्णय म्हणजे शिक्षणमंत्र्यांचा मनमानीपणा आहे, असे शिक्षकांचे म्हणणे आहे. राज्य सरकार १ जून रोजी उच्च न्यायालयात घेतलेल्या निणर्याची माहिती देणार आहे. त्यावेळी न्यायालय काय निर्णय देणार हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.

निकालाची बनवाबनवी करावी लागणार आहे. कोणतेही मूल्यांकन न करता विद्यार्थ्यांना कागदावर गुण द्यावे लागणार आहेत. त्यातून शिक्षणमंत्र्यांनी दुसरा पर्यायच ठेवला नाही. शिक्षक, पालक यांच्याशी साधी चर्चा केली नाही. ग्रामीण भागातील शाळांनी हे निकाल कसे लावायचे हा प्रश्न आहे. त्या शाळा मागील वर्षभर बंदच होत्या. शिक्षणमंत्र्यांनी पटेल असा तरी निर्णय घ्यायचा.
– नागो गाणार, शिक्षक आमदार, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, महाराष्ट्र.

असा लागणार निकाल! 

प्रत्येक विषयाला – १०० गुण
नववीच्या निकालावर – ५० टक्के गुण
चाचणी परीक्षा मूल्यमापन –  ३० टक्के गुण
गृहपाठ आणि तोंडी परीक्षा – २० टक्के गुण

काय आहेत अडचणी ?

  • सध्या १४ जून २०२१ रोजीपर्यंत उन्हाळी सुट्टी आहे. यामुळे बहुतांश शिक्षक उत्तर प्रदेश, तामिळनाडू, गुजरात, मध्यप्रदेश, पंजाब, बिहार, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश अशा विविध राज्यात मूळगावी आहेत. त्यांना परतण्यास किमान १० ते १५ दिवसचा कालावधी लागणार आहेत. तोवर निकालाची प्रक्रिया सुरुच होऊ शकत नाही.
  • राज्यातील ५० टक्क्यांहून अधिक शाळांमध्ये ऑनलाईन वर्गही झाले नाहीत. त्यामुळे त्या शाळांमध्ये चाचणी परीक्षाही झाल्या नाहीत. अशा वेळी त्या शाळा ३० टक्के गुण कसे देणार?
  • विशिष्ट लेखन कार्य, प्रकल्प, गृहपाठ, प्रयोग वह्या आणि अन्य प्रकारच्या साहित्याची पूर्तता झालेली नाही, अशा वेळी २० टक्के गुण शाळा कसे देणार?

(हेही वाचा : दहावीच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात?)

पुढच्या २०-२५ दिवसांत निकालाची औपचारिकता पूर्ण करणार! 

  • निकालासाठी औपचारिकता पूर्ण करण्यासाठी पुढील २०-२५ दिवस पालक, विद्यार्थी आणि शिक्षक प्रयत्न करणार!
  • लेखी परीक्षा घेतल्या नसलेल्या शाळा लेखी परीक्षेचे गुण अंदाजित देणार.
  • तसेच जे विद्यार्थी शाळेच्या संपर्कातच राहिले नाहीत, त्यांचेही गुण अंदाजे द्यावे लागणार.
  • गृहपाठ आणि तोंडी परीक्षेसाठी जे विद्यार्थी शाळेत येणार नाहीत, त्यांचे गुण अंदाजे द्यावे लागणार.
  • अनेक पालकांनी विद्यार्थ्यांना विशिष्ट लेखन कार्य, प्रकल्प, गृहपाठ, प्रयोग वह्या आणि अन्य प्रकारच्या साहित्याची पूर्तता करण्यासाठी पुढील १० ते १५ दिवसांचा कालावधी मागितला आहे.
  • याचा अर्थ पालकवर्गही मुलांकडून गृहपाठ, प्रकल्प, प्रयोग वह्या इत्यादी औपचारिकरित्या भरू घेणार आहेत.

शिक्षणमंत्र्यांनी मनमानीपणे निर्णय घेतला आहे. आता त्यावर अंमलबजावणी करणे, हा एकमेव मार्ग शाळांसमोर आहे. त्यामुळे काहीही आणि कसाही करून परीक्षेशिवाय निकाल लावण्याची औपचारिकता पूर्ण करावी लागणार आहे. यात हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान होणारे हे निश्चित!
– शिवनाथ दराडे,  कार्यवाह, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, मुंबई

७० हजार विद्यार्थ्यांचे ९वीचे निकालच नाहीत! 

२०१९-२०२० मध्ये इयत्ता ९वीमध्ये १९ लाख ३४ हजार ०९४ विद्यार्थी होते. त्यातील १८ लाख ३१ हजार ३४४ विद्यार्थी पास झाले. २४ हजार १०७ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. त्यातील ७८,६४३ विद्यार्थ्यांचे ९वीचे निकालच शाळांमध्ये उपलब्ध नाहीत. त्यातील ७,८७५ मुंबईचे, १२,६१३ ठाणे आणि ११,३६१ विद्यार्थी पुण्याचे विद्यार्थी आहेत. यामागे अनेक कारणे आहेत. कोरोना काळापासून शाळा बंद राहिल्या आणि ऑनलाईन वर्ग सुरु झाले. त्यात अनेक विद्यार्थी गळाले, काही जण मूळ गावी परतले, हे सर्व जण शाळांच्या संपर्कात राहिले नाहीत. त्या मुलांचा निकाल कसा लावायचा, असाही प्रश्न शाळांसमोर उभा राहणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.