मुंबई महापालिकेच्या भ्रष्टाचाराबाबत मुंबई काँग्रेसच्यावतीने २४ विभाग कार्यालयांमध्ये शनिवारी (५ ऑगस्ट) केलेल्या आंदोलनाला एम पूर्व विभाग कार्यालयात गालबोट लागले आहे. एम पूर्व विभाग कार्यालयावर मोर्चा काढणाऱ्या काँग्रेसच्या शिष्टमंडळाशी सौजन्यपूर्ण बोलून त्यांच्या समस्या जाणून घेत असतानाच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने महापालिकेचे कार्यकारी अभियंता अनिल जाधव यांच्या अंगावर तसेच चेहऱ्यावर शाई फेकली. या घटनेनंतर संबंधित काँग्रेस पदाधिकाऱ्या विरोधात देवनार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून या घटनेचा तीव्र निषेध महापालिकेतील सर्व अभियंता आणि कामगार संघटनांनी केला आहे. याचा निषेध म्हणून सोमवारी (७ ऑगस्ट) सकाळी एम पूर्व विभाग कार्यालयात सर्व कर्मचाऱ्यांचे आंदोलन करण्यात येणार आहे.
मुंबई काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी केलेल्या आवाहनानुसार मुंबईतील २४ विभाग कार्यालयांवर मोर्चा काढण्यात आला. त्यानुसार महापालिकेची एम पूर्व विभाग कार्यालयावर शनिवारी दुपारी मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा सुरू असताना या मोर्चामधील शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारण्यासाठी कार्यकारी अभियंता अनिल जाधव यांच्या कार्यालयात निमंत्रित करण्यात आले. या काँग्रेसच्या शिष्टमंडळात माजी आमदार युसुफ अब्रहनी, माजी नगरसेवक आणि काँग्रेस पदाधिकारी असे १५ जणांचा समावेश होता. या शिष्टमंडळाशी चर्चा सुरू असताना मुंबई युथ काँग्रेस तालुका अध्यक्ष आरीफ आब्बास सय्यद यांनी त्यांच्यासोबत आणलेली शाईची बॉटल उघडुन त्यातील शाई जाधव यांच्या अंगावर फेकली. ही शाई त्यांच्या अंगावर, चेहऱ्यावर पडून त्यांच्या डोळ्यात गेली. या घटनेनंतर तत्काळ सुरक्षा रक्षक आणि पोलीस यांनी त्यांना ताब्यात घेतले. ही शाई फेकत असताना आरिफ सय्यद यांनी “हमारा काम नहीं कीया तो तुमको जान से मार दूंगा, आज का तो ये सिर्फ एक नमुना है ” अशी धमकी दिली.
(हेही वाचा – Sexual assault : अभिनेत्रीवर उद्योजकाचा लैंगिक अत्याचार; आठवडा उलटला तरी आरोपीला अटक नाही)
त्यामुळे या आरिफ सय्यद आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या व्यक्ती विरोधात आपापसांत संगणमत करून, कट रचुन तसेच जमाव करून कायदेशिर कार्यालयीन कामकाज करत असतांना, नागरीकांच्या समस्या ऐकत असताना त्याने माझे चेहन्यावर, डोळयावर, अंगावर शाई फेकुन मला इजा करून माझे कामात अडथळा निर्माण केला व मला माझे कामकाज करू दिले नाही तसेच “हमारा काम नहीं कीया तो तुमको जान से मार दूंगा, आज का तो ये सिर्फ एक नमुना है ” असे बोलला म्हणुन देवनार पोलीस ठाण्यात गुन्हा महापालिकेच्या वतीने नोंदविण्यात आला आहे. विशेष म्हणजे या अभियंत्याच्या पाठीशी परिमंडळ उपायुक्त हर्षद काळे हे पोलीस ठाण्यात स्वतः हजर होते.
कार्यकारी अभियंता एम पूर्व विभाग यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि समाजकंटकांना अटक करण्याच्या मागणीसाठी सर्व अभियंते व कर्मचारी यांनी सोमवारी ०७ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १०ः३० वा. एम-पूर्व विभाग कार्यालयात आंदोलनची हाक दिली आहे.
म्युनिसिपल इंजिनियर्स असोसिएशनचे कार्याध्यक्ष नवनाथ घाडगे, बृहन्मुंबई म्युनिसिपल इंजिनिअर्स युनियनचे कार्यध्यक्ष साईनाथ राजाध्यक्ष, म्युनिसिपल मजदुर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव आदींनी आंदोलनाचा इशारा दिला असून कोणत्याही परिस्थितीत अभियंत्यावरील हल्ला सहन करणार नाही. जोवर हल्लेखोरांना अटक होत नाही, तोवर हे आंदोलन सुरूच राहील असा इशारा त्यांनी दिला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community