अती महत्त्वाच्या व्यक्तींनी रुग्णालयात दाखल होऊ नये! काय आहे प्रणिती शिंदे यांचे ट्वीट?

अती महत्त्वाच्या व्यक्तींना सगळ्या सोयी-सुविधा उपलब्ध असल्याने त्यांना गृह विलगीकरणात राहणे सहज शक्य असते. त्यामुळे लक्षणे नसलेल्यांनी रुग्णालयात दाखल होण्याऐवजी गृह विलगीकरणात रहावे.

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने पुन्हा एकदा आरोग्य व्यवस्थेवर ताण पडू लागला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा याबाबत अनेक वेळा चिंता व्यक्त केली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे उपचारासाठी बेड्सची संख्या कमी पडत आहे. त्यामुळे यावर मार्ग काढण्यासाठी, काँग्रेस नेत्या आणि आमदार प्रणिती शिंदे यांनी एक ट्वीट करत आवाहन केले आहे.

काय आहे प्रणिती शिंदे यांचे ट्वीट?

असिम्प्टोमॅटिक म्हणजेच लक्षणे नसलेल्या अती महत्त्वाच्या व्यक्तींनी(व्हीआयपी) रुग्णालयातील बेडचा वापर न करता, होम क्वारंटाईन होण्याचा पर्याय निवडावा, असे आवाहन प्रणिती शिंदे यांनी ट्वीट करत केले आहे. सध्या रुग्णसंख्या सातत्याने वाढत असल्याने ज्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे, अशा कोरोना रुग्णांना सध्या उपचार घेणे कठीण जात आहे. त्यांना रुग्णालयातील बेड वेळेत उपलब्ध न झाल्याने त्यांच्या जीवाला धोका असण्याची भीती आहे, त्यामुळे लक्षणे नसलेल्या अती महत्त्वाच्या व्यक्तींनी कृपा करुन होम क्वारंटाईनचा पर्याय निवडावा, अशी विनंती आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे.

सामाजिक भान राखण्याची गरज

गेल्या काही दिवसांपासून अनेक नेते, कलाकार आणि इतर बड्या व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. तर काही व्यक्तींना कुठलीही लक्षणे नसताना सुद्धा केवळ खबरदारी म्हणून ते रुग्णालयात दाखल होत आहेत. यामुळे ज्यांना खरंच उपचारांची गरज आहे त्यांना वेळेत बेड न मिळाल्याने त्यांची प्रकृती अधिकच खालावते. तसेच अती महत्त्वाच्या व्यक्तींना सगळ्या सोयी-सुविधा उपलब्ध असल्याने त्यांना गृह विलगीकरणात राहणे सहज शक्य असते. त्यामुळे लक्षणे नसलेल्यांनी रुग्णालयात दाखल होण्याऐवजी गृह विलगीकरणात राहण्याचा सल्ला रुग्णालय प्रशासनाकडून सुद्धा देण्यात येतो. त्यामुळे एक सामाजिक भान राखण्याची गरज असल्याने प्रणिती शिंदे यांनी ट्वीट करत आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here