मुंबईत मलेरिया, डेंग्यू, लेप्टोचे रुग्ण वाढले

सप्टेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्याच्या साप्ताहिक पावसाळी आजारांच्या अहवालानुसार मुंबईत मलेरियाचे रूग्ण वाढले आहेत. मुंबईत १८ सप्टेंबरपर्यंत मलेरियाचे ३९८ रुग्ण आढळले आहेत. मलेरियाच्या रुग्णांची दर आठवड्याने होणारी वाढ पाहता वाढती रुग्णसंख्या गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत कमीच असल्याची माहिती महापालिका आरोग्य विभागाने दिली. मलेरिया खालोखाल २०८ मुंबईकरांना गॅस्ट्रोचा त्रास झाल्याचेही अहवालातून स्पष्ट झाले. मात्र डेंग्यूचे १३९ तर लेप्टोचे २७ रुग्ण आढळल्याने सलग तिस-या आठवड्यात लेप्टोच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ दिसून आली आहे.

( हेही वाचा : TET Scam : वेतन बंद केलेल्या शिक्षकांना अंतरिम दिलासा; औरंगाबाद खंडपीठाने दिले ‘हे’ निर्देश)

आरोग्य विभागाची माहिती 

गेल्या आठवड्यापासून मुंबईत सलग तीन दिवस पावसाची संततधार सुरु होती. परिणामी सर्दी आणि खोकल्याचे रुग्णही वाढले. घसा खवखवणे तसेच डोकेदुखीच्या तक्रारींनी मुंबईकरांनी फिजीशियन्सकडे धाव घेतली होती. आता पावसाचा मारा थांबल्यानंतर १२ सप्टेंबर ते १८ सप्टेंबरदरम्यान थेट ३९८ मलेरियाचे रुग्ण आढळल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने जाहीर केले. वाढत्या मलेरिया, डेंग्यू तसेच लेप्टोच्या रुग्णांची संख्या पाहता ताप अंगावर काढू नका, तसेच घरगुती उपयांवर फारसे अवलंबून राहू नका, असे आवाहन पालिका आरोग्य विभागाने केले आहे. यासह मुंबईत हेपेटायटीसचे ४५, चिकनगुनियाचे २ तसेच स्वाईनफ्लूचे ६ रुग्ण आढळल्याची माहिती पालिका आरोग्य विभागाने दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here