कामाठीपुऱ्यात रस्त्यासाठी जागा कमी सोडूनही बांधकामाला परवानगी! सुधार समितीत चौकशीची मागणी

जिथे चारचाकी वाहनही जाऊ शकणार नाही तिथे या इमारतीला परवानगी दिलीच कशी, अशी विचारणा श्रद्धा जाधव यांनी केली.

दक्षिण मुंबईतील एका उपकरप्राप्त इमारतीचा पुनर्विकास करताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आयुक्तांची दिशाभूल केलेली आहे. आयुक्तांनीही अग्निशमन अधिनियमातील तरतुदीनुसार, इमारतीच्या बाजूला नियोजित रस्त्यांकरता जागा सोडलेली नसतानाही, त्याला मंजुरी दिली आहे. स्थापत्य शहर समिती अध्यक्षा श्रध्दा जाधव यांनी सुधार समितीच्या बैठकीत हरकतीच्या मुदद्याद्वारे ही गोष्ट निदर्शनास आणून दिली.

अधिका-यांकडून आयुक्तांची दिशाभूल

दक्षिण मुंबईत आज सेटबॅगची जागा मोकळी सोडणे जिकरीचे जात असून, त्यामुळे अनेक इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे. त्यामुळे रस्त्याचा सेटबॅक देऊन ९.१५ मीटरची जागा सोडणे अपेक्षित आहे. असे असताना सुद्धा जर आयुक्त ४.५७ मीटरची जागा सोडलेली असूनही त्या बांधकामाला परवानगी देत असतील, तर मग ही सवलत एकाच इमारतीला का? असा सवाल करत अधिकाऱ्यांकडून आयुक्तांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप श्रद्धा जाधव यांनी केला आहे.

(हेही वाचाः एम-पूर्व विभागातील समाजकल्याण केंद्राच्या जागांचा होतो गैरवापर!)

नियमांची पायमल्ली

सुधार समितीच्या बैठकीत माजी महापौर श्रध्दा जाधव यांनी कामाठीपुरा येथील एका उपकरप्राप्त इमारतीचा पुनर्विकास ३३ (७)अंतर्गत करण्यात आला. त्यामुळे इमारतीचा पुनर्विकास करताना तिथे रस्त्याकरता ९.१५ मीटरची जागा सोडणे आवश्यक आहे. पण या रस्त्याची रुंदी केवळ ४.५७ मीटर एवढीच असून, या रस्त्यावर वाहनेच जाऊ शकत नाही. त्यामुळे अग्शिमन दलाचे बंबही या ठिकाणाहून जाऊ शकत नाहीत. ही नियमांची पायमल्ली केली जात असून भविष्यात एकप्रकारे वाहतुकीचा बॉटलनेक होईल, अशीही भीती त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे याला अग्निशमन दलाची परवानगी आहे का, असा सवाल जाधव यांनी केला. तसेच जिथे चारचाकी वाहनही जाऊ शकणार नाही तिथे या इमारतीला परवानगी दिलीच कशी, अशीही विचारणा त्यांनी केली.

आयुक्तांनी नियम शिथिल केले का?

आयुक्तांनीही या इमारतीला परवानगी दिल्याची माहिती मिळत आहे, त्यामुळे अशाप्रकारचे नियम आयुक्तांनी शिथिल केले का, याची माहिती द्यावी. तसे असेल तर दक्षिण मुंबईतील अनेक इमारतींना याचा फायदा होईल. त्यामुळे जर याबाबत कोणतेही धोरण नाही तर मग अधिकाऱ्यांकडून आयुक्तांची दिशाभूल केली आहे का याची माहिती समोर यावी, असेही त्यांनी स्प्ष्ट केले.

(हेही वाचाः घाटकोपरच्या उद्यानात १६४ वर्षांपूर्वीच्या तोफा!)

जुनेजा यांचा आरोप

काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक जावेद जुनेजा यांनी जाधव यांच्या मागणीला पाठिंबा दिला. जेव्हा नागरिक स्थापत्य शहर समितीकडे तक्रार घेऊन आले होते, त्यानंतर आपण महापालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. हा भूखंड शंकरराव कुपाला रोड व टँक रोडला जोडणारा आहे. चंद्रमणी बुध्दविहार हा रस्ता मागील बाजूस आहे, जो सहा मीटर रुंदीचाही नाही. तर पुढील बाजूचा रस्ता चार मीटर आहे. हा पुढील रस्ता दाखवून आयुक्तांची दिशाभूल केल्याचे सांगत हा मोठा घोटाळा असल्याचा आरोप जुनेजा यांनी केला आहे. त्यामुळे याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. ही इमारत सहा ते सात माळ्यांची बनवली जात आहे, तिथे जाणारा मार्ग अरुंद आहे. मग भविष्यात काही दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असाही सवाल जुनेजा यांनी केला. यावर सुधार समिती अध्यक्ष सदा परब यांनी याबाबत तात्काळ कार्यवाही केली जावी असे निर्देश देत, जाधव यांचा हरकतीचा मुद्दा राखून ठेवला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here