मुंबईमध्ये २२ हजार सार्वजनिक शौचालये बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात असून यापूर्वी टप्पा १०मध्ये जैविक शौचालय अर्थात बायोटॉयलेट बांधण्यासाठी निविदा काढल्यानंतरही या टॉयलेटची संकल्पना महापालिकेने गुंडाळून ठेवली होती. परंतु आता पुन्हा एकदा मुंबईत जैविक शौचालय बांधण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सन २०१९मध्ये मुंबईतील २४ ठिकाणी जैविक शौचालय उभारण्यात आल्यानंतर आता कोविडनंतर पुन्हा त्याच कंपनीकडून आणखी २४ जैविक शौचालयांची उभारणी करून घेतली जाणार आहे. विशेष म्हणजे मागील वेळेस केवळ शौचालय उभारणीचे काम करणाऱ्या कंपनीला पुढील तीन वर्षांच्या देखभाल दुरुस्तीचीही जबाबदारी सोपवत सुमारे ४ कोटींच्या खर्च यावर केला जाणार आहे. त्यामुळे आधी ना ना म्हणणारे प्रशासन आता जिथे पक्के शौचालय बांधू शकत नाही तिथे बायो टॉयलेट उभारणीवर भर देताना दिसत आहे.
( हेही वाचा : मुंबईतील तबेले आणि गोशाळांमध्ये ‘लम्पी’ चा शोध : गायींचे लसीकरण पहिल्या टप्प्यात )
मुंबईमध्ये बायोटॉयलेट बांधण्याची मागणी नगरसेवकांकडून केली जात आहे. परंतु अशाप्रकारे टॉयलेट बांधण्याची बाब खर्चिक असल्याने महापालिकेने शौचालय बांधणीच्या टप्पा १०मधूनही या शौचालयांचे काम वगळले होते. परंतु त्यानंतर २०१९मध्ये महापालिकेने महापालिकेच्या २४ प्रशासकीय कार्यालयांच्या हद्दीत प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण २४ बायोटॉयलेट बांधण्यासाठी श्री इंटरनॅशलन कंपनीची निवड केली होती. या एका शौचालयांसाठी ९ लाख ९५ हजार रुपये मोजले गेले होते. त्यामुळे २४ शौचालयांसाठी एकूण सुमारे २ कोटी ३९ लाख रुपये खर्च करून त्यांची उभारणी केली होती. त्यानुसार सात ते आठ प्रशासकीय विभागांमध्ये एकूण मिळून २४ जैविक शौचालयांची उभारणी केली होती.
त्यानंतर आता पुन्हा मुंबईत २४ ठिकाणी जैविक शौचालयांची उभारणी केली जाणार आहे. यामध्ये प्रत्येकी शौचालयासाठी ९ लाख ७३ हजारांचा खर्च केला जाणार असून २४ शौचालयांच्या उभारणीसाठी विविध करांसह २ कोटी ७५ लाख ५५ हजार ३६० रुपयांचा खर्च केला जाणार आहे. यासाठी श्री एंटर नॅशनल या कंपनीचीच निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या २४ शौचालयांच्या उभारणीसह ३ वर्षांचे प्रचालन आणि परिरक्षण करण्यासाठी १ कोटी ३९ लाख १७ हजार २९२ रुपयांचेही कंत्राट दिले आहे. त्यामुळे उभारणीसह तीन वर्षांच्या देखभाल व दुरुस्तीकरता एकूण ४ कोटी १४ लाख ७२ हजार रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
मुंबईत काही ठिकाणी मलनि:सारण वाहिनी नसल्याने तसेच जागेच्या कमतरतेमुळे स्वच्छतागृह उभारण्यात महापालिकेला अडचणी येत आहे. त्यामुळे या समस्येवर मात करण्यासाठी छोट्या आकाराची तसेच मलवाहिन्यांची गरज नसलेली जैव स्वच्छता गृहे अर्थात बायोटॉयलेट उभारणे हे सोयीचे असल्याने हा निर्णय प्रशासनाने घेतला असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. बायोटॉयलेट छोट्या आकाराचे असून एका ठिकाणांहून दुसर्या ठिकाणांवर सहजरित्या हलवता येतात. यासाठीचे बांधकाम कमी किंमती होते. तसेच सुक्ष्य जिवाणांमुळे यातील मलाचे विघटन होत असल्याने त्यांना मलवाहिनीची आवश्यकता लागत नाही. तसेच यासाठी पाण्याचीही आवश्यकता कमी लागते. या स्वच्छतागृहांमध्ये असलेल्या विशिष्ट प्रकारच्या सुक्ष्म जिवाणुंद्रे रोग प्रसार करणारे विषाणू नष्ट होतात. प्रत्येक स्वच्छतागृहामध्ये एका दिवसात ३०० माणसे वापर करू शकतात, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
Join Our WhatsApp Community