बोरीवली पूर्व येथील नॅशनल पार्क जवळील श्रीकृष्ण नगरमधील दहिसर नदीवरील वाहतूक पूल हे धोकादायक बनले असून या पुलाची तातडीने बांधणी केली जात असली तरी वन विभागाच्या परवानगी अभावी या पुलाचे दुसऱ्या टप्प्यातील बांधकाम काही अंशी रखडले गेले आहे. या पुलाच्या पुनर्बांधणीकरता विविध करांसह सुमारे १३ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. बोरीवली रेल्वे स्थानकापासून नॅशनल पार्क व मेट्रो रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या आकाशमार्गिका अर्थात स्कायवॉकचे बांधकाम हाती घेतले आहे. या स्कायवॉकचे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारकडूनच या श्रीकृष्ण नगरमधील नदीवरील पुलाचे बांधकाम केले जात असून केवळ वन विभागाच्या परवानगी अभावी हत्ती गेला आणि शेपूट राहिले अशी परिस्थिती या पुलाची झाली आहे.
बोरीवली पूर्व येथील श्रीकृष्ण नगर पुलाचा भाग काही भाग काही दिवसांपूर्वी कोसळला. त्यामुळे या पुलाचा भाग कोसळल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी या पुलाची पाहणी केली. त्यात हे पूल धोकादायक झाल्याने ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. हे पूल अभिनव नगर, श्रीकृष्ण नगर आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग यांना जोडणारा एकमेव पूल असल्याने महापालिकेने तातडीने या पुलाची बांधणी करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून झाल्याने या पुलाचे बांधकाम स्कायवॉकसाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदाराकडून करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार पूर्वीच्या एक मार्गिका असलेल्या या पुलाचे रुंदीकरण करून दोन वाहने धावू शकतील अशा दोन मार्गिका असलेल्या पुलाचे बांधकाम संबंधित कंत्राटदाराकडून करून घेण्यात आले. त्यानुसार एक मार्गिकेचे काम मागील दोन महिन्यांपूर्वी पूर्ण झाले असून उर्वरीत एका मार्गिकेचेही बहुतांशी काम पूर्ण झाले असून उर्वरीत काम वन विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्राअभावी रखडल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या पुलाचे काम एव्हाना पूर्ण होण्याची शक्यता असतानाही नॅशनल पार्कच्या परिसराचा ५० चौरस मीटरच्या जागेतून यापुलाचा भाग जात असल्याने यासाठी वन विभागाची परवानगी आवश्यक आहे. परंतु ही परवानगी न मिळाल्याने श्रीकृष्ण नगरमधील पुलाचे काम रखडल्याचे बोलले जात आहे.
महापालिकेच्या पूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या पुलाचा भाग धोकादायक बनल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार तातडीने या पुलाचे बांधकाम येथील स्कायवॉकसाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदाराकडून करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या पुलाचे बांधकाम हाती घेत पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण केले. पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाल्यानंतर एक मार्गिका दोन महिन्यांपूर्वी सुरु करण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील काम सुरुवात झाली आहे. त्यातील वन विभागाच्या अखत्यारित ५० चौरस मीटरची जागा येत असून या जागेत पुलाची उभारणी करण्यासाठी वन विभागाची परवानगी आवश्यक आहे. या परवानगीसाठी अर्ज करण्यात आला असून नागपूर येथील वन विभागाच्या कार्यालयाच्यावतीने परवानगी मिळण्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे वन विभागाची परवानगी मिळताच दुसऱ्या टप्प्यातील कामाला गती येईल असे पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
(हेही वाचा – न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ)
पूल विभागाचे प्रमुख अभियंता संजय कौडण्यपुरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी श्रीकृष्ण नगरमधील पुलाचे दुसऱ्या टप्प्यातील काम जवळपास पूर्ण होत आहे. काही भाग जो वन विभागाच्या अखत्यारित येत असल्याने यासाठीच्या वन विभागाच्या परवानगीची प्रतीक्षा आहे. वन विभागाची परवानगी मिळताच उर्वरीत पुलाचे काम पूर्ण केले जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले. मुंबई महापालिकेच्यावतीने बोरीवली पूर्व रेल्वे स्थानक ते ओंकारेश्वर मंदिर नॅशनल पार्क पर्यंत स्कायवॉक उभारण्याचा निर्णय घेत कंत्राटदाराची निवड केली होती. या स्कायवॉकसाठी ९१ कोटी रुपये खर्च करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली होती. परंतु या स्कायवॉकचे काम दुकानदारांच्या विरोधामुळे रखडले होते, परंतु या स्कायवॉकचे काम मागील काही महिन्यांपूर्वी सुरु झाले आहे. हे स्कायवॉक बनवणाऱ्या कंत्राटदाराकडून तातडीने श्रीकृष्ण नगर पुलाची बांधणी केली जात आहे. त्यामुळे रेल्वे स्टेशन ते नॅशनल पार्क अशाप्रकारे उभारण्यात येणारे स्कायवॉक मेट्रो रेल्वे स्थानकाला जोडले जाणार असल्याने लोकल रेल्वे आणि मेट्रो कनेक्टिविटी होणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community