भांडूप उषानगर नाल्यावरील तिन्ही पुलांचे बांधकाम प्रगतीपथावर

122

ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत विविध नाल्यांचे रुंदीकरण करण्यात येत असून या नाल्यावरील पूलांची उभारणी केली जात आहे. त्यामुळे भांडूप पूर्व येथील उषा नगर नाल्यावरील तीन धोकादायक पुलांची उभारणी केली जात आहे. या धोकादायक पुलांचे बांधकाम तोडून नवीन पुलाची उभारणी करण्यापूर्वी पर्यायी पुलाची व्यवस्था करण्यात आली असून त्यानंतर आता या पुलाच्या उभारणीला सुरुवात केली जात आहे. त्यामुळे येत्या काही महिन्यांतच या पुलांचा लाभ स्थानिकांना मिळणार आहे.

भांडूप पूर्व येथील वीर सावरकर मार्गावरील उषा नगर नाल्यावरील चामुंडा नगर, मेमन कॉलेज आणि हेमापार्क जवळील असणारी तिन्ही पूल धोकादायक बनल्याने महापालिकेच्यावतीने या पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी महापालिकेच्यावतीने कंत्राटदाराची निवड करण्यात आली आहे. हे पूल धोकादायक बनल्याने त्याचे पाडकाम करणे आवश्यक आहे. परंतु हे पूल तोडल्यास आसपासच्या वस्तीतील लोकांचा संपर्क तुटेल म्हणून महापालिकेने आधी पर्यायी तात्पुरती पुलाची व्यवस्था केल्यानंतर त्या पुलांचे पाडकाम करत त्याठिकाणी पुनर्बांधणी केली जाणार आहे.

त्यामुळे या तिन्ही पुलांच्या पुनर्बांधणीसाठी एपीआय सिव्हीलकॉन या कंपनीची निवड ऑक्टोबर २०२१ करण्यात आली असून या कंपनीच्या माध्यमातून पर्यायी व्यवस्था मागील एक महिन्यांपूर्वी उपलब्ध करून देण्यात आली आहे. पर्यायी वाहतुकीची व्यवस्था झाल्याने आता या तिन्ही पुलांचे पाडकाम हाती घेत त्यांची पुनर्बांधणी केली जात असल्याचे पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. पुनर्बांधणी करण्यात येणाऱ्या पुलाच्या बांधकामासाठी पायलींगचे काम सुरु असून हे काम पूर्ण झाल्यानंतर जुने पुल तोडून पुलाचे बांधकाम केले जाणार असल्याचे पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

या पुलांची होणार पुनर्बांधणी

  • भांडूप पूर्व वीर सावरकर मार्गावरील मेमन कॉलेजजवळ चामुंडानगर येथील नाल्यावरील पूल
  • भांडूप पूर्व चामुंडानगर आणि हेमापार्क मेमन कॉलेज नाल्यावरील पूल
  • भांडूप पूर्व वीर सावरकर मार्गावर हेमापार्क जवळील नाल्यावरील पूल
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.