मराठी नाट्य विश्व आणि मराठी रंगमंच कलादालनाच्या बांधकामाची तिसरी घंटा लवकरच, निविदा प्रक्रिया पूर्ण

गिरगाव चौपाटी येथील बिर्ला क्रीडा केंद्राच्या वास्तूचा पुनर्विकास करून या जागेत मराठी नाट्य विश्व निर्माण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, महापालिकेच्या माध्यमातून या वास्तूचे काम केले जाणार आहे. या वास्तूच्या बांधकामासाठी महापालिकेच्यावतीने निविदा मागवण्यात आली असून, ही निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात लवकरच या मराठी रंगमंच कलादालनाच्या कामाची तिसरी घंटा लवकरच वाजून बांधकामाला सुरुवात केली जाणार आहे.

साकारणार मराठी नाट्य विश्वाची संकल्पना

गिरगाव येथील बिर्ला क्रीडा केंद्राच्या जागेवर सुमारे ३ लाख ५० हजार चौरस फूट क्षेत्रावर दोन टप्प्यांमध्ये, मराठी रंगमंच कला दालनासाठी एकमेवाद्वितीय अशा स्वरूपात पुनर्विकास करून तिथे ‘मराठी नाट्य विश्व’ या नावाने नाट्यगृह व मराठी रंगभूमी संग्रहालय असा एकत्रित प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मराठी नाट्य विश्वाची संकल्पना प्रत्यक्षात साकारली जात असून, याच्या बोधचिन्हाचे अनावरण मे महिन्यामध्ये राज्याचे तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वर्षा निवासस्थानी पार पडले होते.

राज्य सरकारची तयारी

या भूखंडाची मालकी राज्य सरकारकडे आहे. काही वर्षांपूर्वी या जमिनीचा तुकडा राज्य सरकारने महापालिकेला भाडेतत्वावर दिला होता. त्यानंतर या जागेवर बिर्ला क्रीडा केंद्राची वास्तू बिर्ला समूहाने उभारली आणि सभागृह महापालिकेला सुपूर्द केले होते. कालांतराने ही वास्तू जुनी झाल्याने, तसेच वापरात नसल्याने पडून राहिली. त्यामुळे याजागी मराठी नाट्यविश्व उभारण्याचा प्रस्ताव राज्य शासनाने तयार केला आणि त्यासाठी शासनाच्यावतीने खर्च करण्याची तयारीही दर्शवली.

अशी आहे उभारणी

त्यानुसार, पहिल्या टप्प्यात दोन तळमजले अधिक तीन मजली इमारतीचे टेरेस फ्लोअरसह काम करण्यात येणार आहे. त्यात तळमजल्यावर पार्किंगची व्यवस्था, पहिल्या मजल्यापासून तिसऱ्या मजल्यापर्यंत मराठी नाट्य विश्वाशी निगडीत बांधकाम करण्यात येणार आहे. सुमारे ६०० आसन क्षमतेचे हे नाट्यगृह असून १५० आसनी एम्फीथिएटर,कॅफेटेरिया, गच्चीवर बगीचा व खुला रंगमंच, मराठी रंगभूमीचे कलादालन अशा बाबींचा यात समावेश आहे.

या कंपन्यांची निवड

या वास्तूच्या बांधकामासाठी सुमारे १५० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून, या कामांसाठीच्या कंत्राट कामांच्या प्रस्तावाला प्रशासकांची मंजुरी प्राप्त झाल्याची माहिती मिळत आहे. या प्रकल्प कामासाठी मनिषा प्रोजेक्ट्स, सी.ई.इन्फा आणि आर अँड बी, एमसीआर जेव्ही या कंपनीची निवड करण्यात आली आहे.

अतिरिक्त आयुक्तांची माहिती

यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्याशी विचारणा केली असता, त्यांनी या वास्तूचे दोन टप्प्यात विकास केला जाणार असल्याचे सांगितले. त्यामध्ये वास्तूचे बांधकाम आणि अंतर्गत बांधकाम यांचा समावेश असून यामध्ये कोणते साहित्य असावे यासाठी शासनाने एक कमिटी नियुक्त केली आहे. यामध्ये आपल्यासह नाट्य कलावंतांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. या कमिटीच्या सूचनेनुसारच अंतर्गत बांधकामाचा आराखडा तयार केला जाणार आहे. त्यानुसार इलेक्ट्रीकसह इतर कामे केली जाणार आहे.

तसेच या मराठी नाट्य विश्वात इंदौर, तंजावर तसेच गोव्यासह इतर भागातील नाट्य साहित्य जतन केले जाणार आहे. या वास्तूसाठी राज्य शासनाच्यावतीने १ कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here