रस्त्यापाठोपाठ आता मुंबई शौचालयांचे बांधकाम कॉर्पोरेट कंपन्यांच्या माध्यमातून?

329
रस्त्यापाठोपाठ आता मुंबई शौचालयांचे बांधकाम कॉर्पोरेट कंपन्यांच्या माध्यमातून?
रस्त्यापाठोपाठ आता मुंबई शौचालयांचे बांधकाम कॉर्पोरेट कंपन्यांच्या माध्यमातून?

सचिन धानजी, मुंबई

मुंबईत टप्पा ११ अंतर्गत बांधण्यात आलेल्या २२ हजार सार्वजनिक शौचालयांच्या उभारणीनंतर मुंबई महापालिकेने टप्पा १२ अंतर्गत सार्वजनिक शौचालयाच्या उभारणीचे काम हाती घेण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू केली आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली असताना आता प्रशासनाने मात्र या शौचालयांची उभारणी कॉर्पोरेट कंपन्यांकडून करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्या प्रकारे रस्ते कंत्राट कामात प्रस्थापित कंपन्यांना बाजूला करत मोठ्या कंत्राटदारांना महापालिकेच्या विकास प्रकल्पांच्या कामांमध्ये सहभागी करून घेतल्यानंतर आता शौचालयांच्या कामांमध्येही अशा प्रस्थापित कंत्राटदारांच्या नांग्या ठेचण्याचा निर्धार केला आहे. आणि त्या दृष्टिकोनातूनच प्रशासनाने कॉर्पोरेट कंपन्यांचा सहभाग नोंदवून घेण्याचा विचार सुरू केला आहे. त्यामुळे भविष्यात मुंबईतील शौचालयांची उभारणी हे कॉर्पोरेट कंपन्यांच्या माध्यमातून केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या माध्यमातून टप्पा १२ अंतर्गत १४ हजार सार्वजनिक शौचालयांची बांधकाम करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महापालिकेच्या वतीने २४ विभाग कार्यालयांच्या हद्दीमध्ये २८ भागांमध्ये विभागून निविदा मागवण्यात आली. सुमारे ५०० कोटी रुपयांच्या या कंत्राट कामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात या कामांचा मसुदा पत्र मंजुरी करण्याची वेळ आली तेव्हा प्रशासनाला या शौचालयांची कामे कार्पोरेट कंपन्यांकडून करून घेण्याची आठवण झाली. त्यामुळे या शौचालयांची कामे कॉर्पोरेट कंपन्यांकडून करून घेण्यासाठी प्रशासनाने अखेर ही निविदा प्रक्रियाच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

सरकारमधील मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी सध्याच्या सार्वजनिक शौचालयांच्या कामांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आजवर केलेल्या सार्वजनिक शौचालयांच्या कामांचा दर्जा निकृष्ठ असल्याने कॉर्पोरेट कंपन्यांकडून ही कामे करून घेण्याचा सूचना सरकारमधील मंत्र्यांकडून प्राप्त झाल्याने महापालिका प्रशासनाने या सार्वजनिक शौचालयांसाठी राबवलेली निविदा प्रक्रिया स्थगित ठेवली आहे. त्यामुळे या १४ हजार सार्वजनिक शौचालयांमधील काही शौचालयांचे बांधकाम कॉर्पोरेट कंपन्यांमार्फत करून घेण्याचा विचार आहे. यातील २० टक्के शौचालये ही कॉर्पोरेट कंपन्यांमार्फत तर ८० टक्के शौचालयांची कामे ही प्रस्तापितांकडून किंवा सर्वच कामे महापालिकेच्या निधीतून किंवा सीएसआर निधी प्राप्त झाल्यास त्यातून एल अँड टीसह अनेक कॉर्पोरेट कंपन्यांकडून करून घेण्याचा विचार असल्याचे बोलले जात आहे.

(हेही वाचा – Indian Population : भारत म्हातारा होतोय? काय सांगते लोकसंख्येची आकडेवारी?)

विशेष म्हणजे कॉर्पोरेट कंपन्यांकडून रस्त्यालगत किंवा महामार्गालगतची किंवा जिथे कोणत्याही प्रकारचा अडथळा नाही त्याठिकाणची कामे ही कॉर्पोरेट कंपन्यांमार्फत करून घेण्याचाही विचार आहे. विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी रस्त्यांची सहा हजार कोटी रुपयांची कामे ही प्रस्तापित कंत्राटदार कंपन्यांच्या माध्यमातून न करता महामार्ग आणि विमानतळाच्या धावपट्टीचे बांधकाम करणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून करून घेण्याचा निर्णय घेतला. त्याद्वारे प्रस्तापित कंत्राटदारांना बाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर आता शौचालयांचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम करणाऱ्या प्रस्तापित कंत्राटदारांनाही आता बाहेरचा रस्ता कॉर्पोरेट कंपन्यांना महापालिकेच्या कामांमध्ये सहभागी करून घेण्याचा विचार आहे. या कॉर्पोरेट कंपन्याद्वारे मुंबईच्या शौचालयांचे बांधकाम उत्कृष्ट दर्जाचे करण्याचा सरकार आणि प्रशासनाचा विचार आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.