कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडमध्ये कांदळवनाच्या संरक्षणासाठी दोन कलव्हर्टचे बांधकाम!

या कलव्हर्टमुळे कांदळवनाला समुद्राच्या भरतीचे पाणी पोहोचून कांदळवनांचा होणारा ऱ्हास टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे.

कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडला आवार भिंत बांधल्यास कांदळवनाच्या जागेत भरतीचे पाणी पोहोचू शकत नाही. त्यामुळे अखेर या कांदळवनाचे संरक्षण करायला याठिकाणी वाहतुकीसाठी दोन पूल उभारुन अतिरिक्त मोऱ्या(कलव्हर्ट) बांधण्याचा निर्णय अडीच वर्षांपूर्वी घेण्यात आला. पण अद्यापही हा निर्णय कागदावरच असून आता प्रशासनाने त्यासाठी कंत्राटदाराची निवड केली आहे. या कलव्हर्टमुळे कांदळवनाला समुद्राच्या भरतीचे पाणी पोहोचून कांदळवनांचा होणारा ऱ्हास टाळण्याचा प्रयत्न केला जात आहे.

महापालिकेने २०१४ मध्ये दिली होती याचिका

मुंबईत दरदिवशी निर्माण होणारा कचरा ज्याठिकाणी टाकला जातो, त्या मुलुंड आणि देवनार डम्पिंग ग्राऊंडची क्षमता संपुष्टात आल्याने, मुंबई महापालिकेला कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडची जागा प्राप्त झाली. त्यानंतर ४ ऑक्टोबर २०१३ मध्ये पर्यावरण वन मंत्रालयाने कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडमधील किनारपट्टी नियमन क्षेत्रामध्ये (सीआरझेड) तसेच कांदळवनाने बाधित क्षेत्रात असलेली आवार भिंत पाडण्याचे आदेश आणि त्याऐवजी काटेरी तारेचे कुंपण घालण्याची मुभा दिली होती. या आदेशाला महापालिकेने रिट याचिकेद्वारे २०१४ मध्ये आव्हान दिले होते. यावेळी महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र नियमन प्राधिकरणाने(एमसीझेएमए) उच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालात, आवार भिंतींच्या बांधकामामुळे व अपुऱ्या कलव्हर्टमुळे कांदळवनाला भरतीच्या पाण्याचा पुरवठा कमी होत असल्याने कांदळवनाचा ऱ्हास होत असल्याचे नमुद केले होते. त्यामुळे उच्च न्यायालयाने एमसीझेएमए, पर्यावरण व वन मंत्रालयाने सादर केलेल्या अहवालाच्या दृष्टीने पावले उचलण्याचे आदेश महापालिकेला दिले.

(हेही वाचाः एम-पूर्व विभागातील समाजकल्याण केंद्राच्या जागांचा होतो गैरवापर!)

४ कोटी १२ लाखांचे कंत्राट

यावर रिट याचिका २०१४च्या पुनर्विचार याचिका २०१७ मध्ये उच्च न्यायालयाने १० जुलै २०१८ मध्ये कांदळवनाच्या संरक्षणासाठी बांधण्यात येणाऱ्या कलव्हर्टबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. या कामासाठी तज्ञ नेमण्यात आले. त्यानंतर मुख्य वन संरक्षक(कांदळवन कक्ष) राज्य शासनाच्या प्रतिनिधीने त्याठिकाणी १० ऑक्टेाबर २०१८ रोजी भेट दिली. कांदळवन वाचवण्यासाठी भरतीच्या पाण्याचा प्रवाह सुरळीत होण्यासाठी ३ मीटर रुंदीचे दोन कलव्हर्ट बांधण्याचा सल्ला दिला. या सल्ल्यानुसार कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंड येथे भरतीच्या पाण्याचा प्रवाह सुरळीत होऊन कांदळवन जगवण्यासाठी दोन अतिरिक्त कलव्हर्ट बांधण्यासाठी नोव्हेंबर २०२० रोजी निविदा मागवली. यामध्ये ए.पी.आय. सिव्हिलकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी पात्र ठरली असून, या कंपनीला ४ कोटी १२ लाख रुपयांचे कंत्राट देण्याचे निश्चित केले आहे. हे काम पुढील सहा महिन्यांमध्ये पूर्ण करणे आवश्यक आहे.

कांजूरमार्गमध्ये दरदिवशी ४००० ते ४५०० मेट्रिक टनची विल्हेवाट

मुंबईत दरदिवशी निर्माण होणाऱ्या ६५०० ते ६८०० मेट्रिक टन कचऱ्यापैंकी कांजूरमार्ग येथे दररोज ४००० ते ४५०० मेट्रिक टन नागरी कचऱ्यावर शास्त्रोक्त पध्दतीने बायोरिएक्टर तंत्रज्ञानाद्वारे प्रक्रिया करण्यात येते. तसेच १ हजार मेट्रिक टन कचऱ्यावर विंडरोव खतनिर्मिती तंत्रज्ञानाद्वारे प्रक्रिया करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here