कांद्याच्या किंमती अचानक वाढल्याने आजवर गृहिणी आणि सर्वसामान्यांच्या डोळ्यात अनेकदा पाणी आले आहे. बाजारात कांदा कमी झाला की काही व्यापारी साठेबाजी करून कांदा चढ्या भावानं विकतात. पण आता याचसाठी केंद्र सरकारने एक योजना केली आहे.2022-23 या आर्थिक वर्षात कांद्याचा अडीच लाख किलोंचा साठा करायचे सरकारने ठरवले आहे.
इतक्या मोठ्या प्रमाणात कांद्याची साठवणूक करण्याचा हा आतापर्यंतचा रेकॉर्ड आहे. हा साठा कांद्याचा तुटवडा जाणवू लागल्यावर बाजारात योग्य दरात उपलब्ध होणार आहे.
ग्राहक मंत्रालयाची तयारी
मिळालेल्या माहितीनुसार, या वर्षी ऑगस्ट ते डिसेंबर या महिन्यांत कांद्याचे उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे देशात कांद्याचा तुटवडा होऊन कांद्याचे भाव वाढू शकतात. त्यामुळेच हा पुरवठा कमी पडू नये म्हणून केंद्र सरकारने हा उपाय केला आहे. केंद्रीय ग्राहक मंत्रालयाकडून कांद्याची साठवणूक करण्याची तयारी करण्यात येत आहे.
या राज्यांतून खरेदी
महाराष्ट्र,गुजरात,मध्य प्रदेश यांसारख्या उत्तम कांदा उत्पादक राज्यांकडून केंद्र सरकारने कांद्याची ही खरेदी केली आहे, असे सांगितले जात आहे. मंत्रालयाच्या अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, देशातील 65 टक्के कांदा उत्पादन एप्रिल ते जून दरम्यान पेरले जाते आणि ऑक्टोबरमध्ये त्याची कापणी केली जाते. जी नंतर सरकार शेतकऱ्यांकडून खरेदी करून साठा करते. त्यामुळेच पावसाळ्याच्या दिवसातही देशात कांद्याचा तुटवडा जाणवत नाही.
Join Our WhatsApp Community