जलवाहिनीत अडकून एका कामगाराचा मृत्यू

127

काळाघोडा येथे जलअभियंता विभागामार्फत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु असताना त्यामध्ये अडकून एका कामगाराचा मृत्यू झाला. फोर्ट येथील फ्लोरा फाऊंडटन येथील ही घटना असून अडकलेल्या एका कामगाराला त्वरीत बाहेर काढण्यात आल्याने त्याच्यावर उपचार करून सोडून देण्यात आले आहे.

जलवाहिनीमध्ये कामगार अडकलेले

वीर नरीमन रोडलगत फ्लोरा फाऊंटन ते चर्चगेट दरम्यान हायकोर्ट येथे ३० मीटरच्या पट्टयात १२०० मि.मी व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम महापालिकेच्यावतीने सुरु आहे. महापालिकेच्या नेमण्यात आलेल्या कंत्राटदारामार्फत हे काम सुरु होते. या जलवाहिनीची मोटर लाईन टाकण्याचे काम सुरु असल्याने कंत्राटदाराचे कामगार काम करण्यासाठी दुपारी तीन वाजता मॅनहोल्समधून आतमध्ये शिरले होते. परंतु आतमध्ये शिरल्यानंतर टाटा पॉवर केबल्स आणि इतर युटिलिटीजमुळे पाण्याच्या पाईपचा मुख्य भाग थोडासा वाकवलेला होता, तिथे हे दोन्ही कामगार फसले होते. त्यातील एका कामगाराला इतर कामगारांच्या मदतीने सुपरवायझरने बाहेर काढत त्वरीत जी.टी रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याच्यावर उपचार करून त्याला सोडून देण्यात आले.

जलवाहिनी कापून कामगाराला बाहेर काढले

दरम्यान, दुसऱ्या कामगाराचा शोध अग्निशमन दलाच्या जवानाच्या माध्यमातून घेण्यात आला. त्यावेळी हा कामगार जिथे दिसला तिथे गॅस कटरच्या माध्यमातून काँक्रिटचा भाग खोदून तसेच जलवाहिनीचा मुख्य भाग कापून त्या कामगाराला बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्याला त्वरीत जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. पिटू सिंग (३४) असे कामगाराचे नाव आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जलवाहिनीमध्ये माती किंवा चिखल असल्याने हा प्रकार घडला असवा. परंतु या प्रकरणाची माहिती घेण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.