ऑक्सिजन कॉन्संट्रेटरसाठी कॉर्पोरेट कंपन्या आणि संस्थांकडून महापालिकेला मदत!

महापालिकेने कोविड रुग्णालय आणि सेंटरमध्ये ऑक्सिजन कॉन्संट्रेटर उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या महापालिकेकडे विविध कॉर्पोरेट कंपन्या आणि संस्थांकडून याबाबत विचारणा केली जात आहे.

मुंबई महापालिकेला आता विविध कॉर्पोरेट कंपन्या आणि खासगी संस्थांच्या माध्यमातून कोविड निवारणासाठी मदतीचा ओघ सुरू आहे. आता ऑक्सिजन कॉन्संट्रेटरसाठी महापालिकेला कॉर्पोरेट कंपन्या आणि संस्थांचा मदतीसाठी हात पुढे झाला आहे. त्यामुळे प्रत्येक कोविड सेंटरमधील कॅज्युअल्टीमध्ये गरजेनुसार प्रत्येकी पाच ते दहा ऑक्सिजन कॉन्संट्रेटर महापालिकेच्यावतीने उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.

कंपन्या आणि संस्थांकडून विचारणा

मुंबईतील वाढती रुग्ण संख्या आणि वाढत्या ऑक्सिजन व आयसीयू बेडची मागणी लक्षात घेता, आता महापालिकेने आपल्या कोविड रुग्णालय आणि सेंटरमध्ये ऑक्सिजन कॉन्संट्रेटर उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या महापालिकेकडे विविध कॉर्पोरेट कंपन्या आणि संस्थांकडून याबाबत विचारणा केली जात आहे. त्यामुळे महापालिकेनेही या सर्वांकडून सीएसआर निधीतून किती प्रमाणात ऑक्सिजन कॉन्संट्रेटर प्राप्त होतात, हे पाहून उर्वरित ऑक्सिजन कॉन्संट्रेटर हे महापालिका स्वत: खरेदी करणार असल्याची माहिती मिळत आहे. महापालिकेच्यावतीने १० लिटरचे १२०० नग आणि ५ लिटर क्षमतेचे ३०० नग कॉन्संट्रेटर खरेदी करण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे.

(हेही वाचाः लसीकरणाच्या संदेशानंतरच घराबाहेर पडा!  महापौरांचे जनतेला आवाहन)

गरज असेल तेवढेच कॉन्संट्रेटर घेणार

यासंदर्भात महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांच्याशी संपर्क साधला असता, एवढ्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन कॉन्संट्रेटर महापालिकेच्यावतीने खरेदी केली जात नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. ऑक्सिजन कॉन्संट्रेटरचा उपयोग हा रुग्णाला तात्पुरत्या स्वरुपात ऑक्सिजनची पातळी वाढवण्याकरता होतो. पण त्याचा दुरगामी परिणाम होत नाही. त्यामुळे कॅज्युअल्टी वॉर्डमध्ये आवश्यकतेनुसार, पाच ते दहा ऑक्सिजन कॉन्संट्रेटर उपलब्ध करुन देत आहोत. सध्या अनेक संस्था आणि कंपन्यांकडून यासाठी मदतीचा हात पुढे होत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आधी किती कॉन्संट्रेटर उपलब्ध होतात ते पाहिले जाईल आणि उर्वरित महापालिकेच्यावतीने खरेदी केले जातील. यासाठी महापालिकेच्यावतीने निविदा काढली जात आहे. पण जेवढी गरज असेल तेवढे कॉन्संट्रेटर खरेदी केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here