कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा नवीन प्रकार समोर आला आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, ‘एरिस’नंतर आता ‘पिरोला’हा नवीन व्हेरिएंट वेगाने पसरत आहे. त्यामुळे जगभरातील आरोग्य अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.
Covid-19, Aris (EG.5)आणि Pirola (BA.2.86) हा नवीन व्हेरिएंट सध्या अनेक देशांमध्ये वेगाने पसरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने पिरोलाला ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ या कॅटेगरीमध्ये ठेवलं आहे. पिरोलाची 30 पेक्षा जास्त लक्षणं सांगितली आहेत. त्यामुळे आरोग्य तज्ज्ञांनी प्रत्येक देशाने सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. अमेरिकाव्यतिरिक्त या व्हेरिएंटचा युके, डेन्मार्क, दक्षिण आफ्रिका आणि इस्त्रायल यासारख्या अनेक देशांमध्ये प्रसार झाला आहे. या देशांमध्ये हा आजार वेगाने पसरत आहे. त्यामुळे तेथील सरकार आणि प्रशासनही याबाबत पूर्णपणे सतर्क आहे. यामुळे अमेरिकेत शाळा, महाविद्यालय, कार्यालय, संस्था आणि इतर सार्वजनिक ठिकाणी मास्क लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पिरोला व्हेरिएंटची लागण झालेल्यांमध्ये सामान्यत: ताप, सर्दी-फ्लूसारख्या रोगांची लक्षणे दिसतात. काही लोकांना खोकला, थकवा, डोकेदुखी आणि अंगदुखी, भूक न लागणे, पुरळ, अतिसार आणि श्वासोच्छवासाचा त्रास जाणवत असल्याची माहितीही आरोग्य तज्ज्ञांनी दिली आहे.
आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला…
त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घ्यावी, गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क लावणे, वारंवार हात धुणे, श्वसनाच्या संक्रमणापासून स्वत:चे रक्षण करण्याबाबत जागरुक राहणे तसेच जर एखाद्याला ताप आणि श्वसनाची लक्षणे असतील तर त्यांनी घराबाहेर पडणे टाळावे. ज्यांना गंभीर आजाराचा धोका जास्त आहे त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क लावणे आवश्यक आहे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
Join Our WhatsApp Community