दिवाळीत कोविड-१९ ची पुन्हा भीती; नागरिकांनी भेटीगाठीत प्रतिबंधात्मक काळजी घेण्याचे महापालिकेचे आवाहन

104

कोविड संसर्गाचा नवीन उपप्रकार आढळला असून दीपावली सारख्या सण उत्सवाच्या कालावधीत अधिक संख्येने होणाऱ्या भेटीगाठी, कार्यक्रम लक्षात घेता नागरिकांनी संसर्ग प्रतिबंधात्मक काळजी घ्यावी, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

( हेही वाचा : नरिमन पॉईंटमधील एअर इंडियाची इमारत राज्य सरकारला मिळणार )

महाराष्ट्र शासनाच्या अहवालामध्ये ओमिक्रोन विषाणूचे नवीन उपप्रकार आढळून आले आहेत. हे नवीन उपप्रकारांचे जुन्या ओमिक्रॉनच्या उपप्रकारांपेक्षा अधिक प्रमाणात संसर्गजन्य ठरू शकतात. ऑक्टोबर २०२२ च्या दुसऱया आठवड्यात कोविड – १९ च्या रुग्णांची वाढलेली संख्या आणि जवळ आलेला सणांचा हंगाम लक्षात घेता, नागरिकांनी अधिक खबरदारी घेण्याची गरज आहे. कारण मोठ्या सणासुदीच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक एकत्र येतात. कार्यक्रम, सोहळे, भेटीगाठी, मेळावे, जत्रा यासह बंदिस्त आणि हवेशीर नसलेल्या ठिकाणी देखील नागरिक एकत्र आल्यानंतर कोविड सुरक्षित वर्तनाकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे.

अशा स्थितीत कोविड संसर्गाचा फैलाव होवू नये यादृष्टीने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार, उपआयुक्त सार्वजनिक आरोग्य संजय कुऱ्हाडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी कोविड प्रतिबंधात्मक वर्तन राखण्याच्या दृष्टीने खबरदारीच्या उपाययोजना सुचविलेल्या आहेत.

जनतेने कशी घ्यावी काळजी

  • सणासुदीच्या काळात कोविड – १९ प्रतिबंध करण्यास योग्य ठरेल, असे वर्तन राखणे महत्त्वाचे आहे.
  • ज्या नागरिकांनी अद्यापही कोविड प्रतिबंधात्मक लस घेतली नसेल, तर आता लस घेण्याची योग्य वेळ आहे. जर रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल किंवा रोगप्रतिकारक शक्तीला धोका पोहोचणार असेल तर कोविड लसीची वर्धक मात्रा (बूस्टर डोस) घेतल्यास विषाणू विरोधात प्रतिकारशक्ती वाढविण्यास मदत होवू शकते.
  • घरामध्ये हवा खेळती ठेवा, कारण बंद खोल्यांमध्ये विषाणू फैलावतात.
  • लक्षणे असलेल्या रुग्णांशी नजीकचा संपर्क टाळावा.
  • वारंवार हात स्वच्छ धुवा.
  • शिंकताना किंवा खोकताना नाक आणि तोंड झाकण्यासाठी रुमाल तथा टिश्यू पेपरचा वापर करा.
  • संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टी (मास्क) घालणे आवश्यक आहे.
  • लक्षणे दिसू लागताच कोविडची चाचणी करुन घेणे अतिशय गरजेचे आहे. कोविड चाचणीच्या परिणामांची वाट न पाहता, खबरदारी म्हणून स्वत:ला इतरांपासून वेगळे तथा दूर ठेवा, जेणेकरून संक्रमणाची साखळी तोडता येईल आणि इतरांना संसर्ग होणार नाही.
  • कोविडचे निदान लवकरात लवकर झाल्यास त्यावरील उपचार करण्यास मदत होते. म्हणून जितक्या लवकर कळेल की कोविड बाधित आहात, त्यानुसार उपचार किंवा रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी चाचणी लवकरात लवकर करुन घेणे आवश्यक आहे.
  • श्वास घेण्यास त्रास होणारे रुग्ण तसेच रोगप्रतिकार शक्ती कमी असलेले रूग्ण आणि ज्यांनी कोरोना संसर्ग प्रचलित असलेल्या देशांना नुकतीच भेट दिली आहे, अशा प्रकारच्या रुग्णांनी त्वरित वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.