राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. रुग्णसंख्या ही सतत वाढताना दिसत आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णांसाठी आरोग्य व्यवस्था पुरवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आता या आरोग्य यंत्रणेतील त्रुटी समोर येताना दिसत आहे. अशीच एक धक्कादायक घटना नाशिक येथे घडली. नाशिक शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना, रुग्णालयात बेड मिळत नसल्याने नाशिक महापालिका मुख्यालयाच्या आवारात ऑक्सिजन सिलेंडर घेऊन दोन कोरोनाबाधित रुग्णांनी बुधवारी ठिय्या आंदोलन केले. दुर्दैवाने आज त्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
महापालिका मुख्यालयात ठिय्या आंदोलन
कोरोनाबाधित असून सुद्धा महापालिका क्षेत्रातील रुग्णालयात बेड मिळत नसल्याने दोन कोरोनाबाधित रुग्णांनी बुधवारी संध्याकाळी थेट नाशिक महापालिका मुख्यालयातच ऑपरेशन सिलेंडर आवून ठिय्या आंदोलन सुरू केले. त्यामुळे महापालिका मुख्यालयात एकच खळबल उडाली. रुग्णांच्या या आंदोलनानंतर पालिका प्रशासनानं या दोन्ही रुग्णांना बिटको रुग्णालयात दाखल केले होते. उपचार घेत असताना मध्यरात्री बिटको रुग्णालयात एका रुग्णाचा मृत्यू झाला.
(हेही वाचाः मुंबईत मृत्यूचा आकडा झाला दोन अंकी!)
आंदोलन करण्यास आणणा-यांवर गुन्हा दाखल
या खळबळजनक प्रकारानंतर आता या रुग्णांना महापालिका मुख्यालयात घेऊन येणा-यांवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. बेड मिळत नसल्याने संबंधित रुग्णांना महापालिकेत आणणाऱ्या व्यक्तींवर सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
जबाबदारी झटकू नका- दरेकर
या घटनेनंतर एकूणच आरोग्य व्यवस्थेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. यावरुन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी सरकारला जाब विचारला आहे. फक्त माझे कुटुंब, माझी जबाबदारी म्हणून सरकारने स्वतःची जबाबदारी झटकू नये, असे ट्वीट करत दरेकर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच संबंधित रुग्णाच्या मृत्युची तातडीने चौकशी लावून त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
फक्त माझे कुटुंब, माझी जबाबदारी म्हणून स्वतःची जबाबदारी झटकू नका.@CMOMaharashtra @rajeshtope11
नाशिक मध्ये बेड अभावी आंदोलन करणाऱ्या रुग्णाच्या मृत्यूची तातडीने चौकशी लावा, आणि व्यवस्थेचा बळी ठरलेल्याच्या कुटुंबाला 50 लाख रुपयांची मदत द्या.@BJP4Maharashtra— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) April 1, 2021