देशभरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. आधीच्या दोन लाटांच्या तुलनेत दिवसागणिक वाढणारी रुग्णसंख्या आता अवघ्या 4 दिवसांत दुप्पट होताना दिसत आहे. त्यातच आता कोविड टास्क फोर्सच्या प्रमुख डाॅक्टर अरोरा यांनी धक्कादायक खुलासा करत, देशाला ज्या तिस-या लाटेची चिंता सतावत होती, ती अखेर धडकल्याचे स्पष्ट केले आहे. देशात ओमायक्राॅन या विषाणूचे 75 टक्के रुग्ण असल्याचा धक्कादायक खूलासा टास्क फोर्सकडून करण्यात आला आहे.
ओमायक्राॅनबाधित रुग्ण वाढल्याने धोका
गेल्या दोन आठवड्यांपासून कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. ओमायक्राॅन बाधीत पहिला रुग्ण भारतात सापडल्यानंतर आठवड्याभराने कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढू लागली. खासकरुन, मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नईसारख्या महानगरांत ओमायक्राॅनचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. टास्क फोर्सचे डाॅक्टर अरोरा यांनी सांगितल्याप्रमाणे देशात नवे कोरोनाबाधित जे रुग्ण आढळत आहेत, ते ओमायक्राॅन या विषाणूचे बाधित आहेत. 30 हजारांहून जास्त असणारी ही रुग्णसंख्या रोज झपाट्याने वाढत आहे. या बाधितांपैकी जवळजवळ 25 हजार रुग्ण हे ओमायक्राॅन बाधित असल्याचं टास्क फोर्सच्या डाॅक्टरांनी स्पष्ट केलं आहे.
( हेही वाचा :धक्कादायक! स्वत:च्याच श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवून जोडप्याची आत्महत्या )
प्रशासन अलर्ट
पहिल्या आणि दुस-या लाटांहून तिसरी लाट अधिक विस्फोटक असू शकते, त्यामुळे धोका अधिक वाढला असल्याचे सांगण्यात येत आहे. आता या पार्श्वभूमीवर केंद्राच्या आरोग्य विभागाकडून 23 राज्यांतील मुख्य सचिवांना पत्र लिहून, विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, लसीकरणावर भर देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे कोविड नियमांची त्रिसूत्री पाळण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community