कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा पुढील भाग म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात आज बुधवार, दिनांक १६ मार्च २०२२ पासून १२ वर्षे पूर्ण ते १४ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांचे कोविड-१९ लसीकरण करण्यात येणार आहे. मुंबईतील १२ समर्पित केंद्रांवर २ दिवस प्रायोगिक तत्त्वावर दुपारी १२ वाजेपासून हे लसीकरण सुरु होणार आहे. १२ समर्पित लसीकरण केंद्रांचा अभ्यास, अडचणी आणि प्रतिसाद पाहून आरोग्य सुविधांसह इतर बाबींचा विचार करुन त्यानंतर महानगरपालिकेच्या व शासनाच्या सर्वंच केंद्रांवर १२ ते १४ वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण करण्याचे नियोजन आहे.
दोन डोसमध्ये किती अंतर असावे?
केंद्र सरकारकडून १२ ते १४ या वयोगटातील लहान मुलांसाठी हे लसीकरण सुरू होणार आहे. लहान मुलांना बायोलॉजिक ईएस कोर्बोवॅक्स कंपनीची लस दिली जाण्याची शक्यता आहे. एनटीएजीआयने १२ ते १४ या वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्याची शिफारस केली होती. आरोग्य मंत्रालयाकडून यासंदर्भात गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. कोर्बोवॅक्स ही लस मुलांना दिली जाणार असून दोन डोसमध्ये २८ दिवसांचं अंतर असणार आहे. याबाबतीत गाईडलाईन्स सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आल्या आहेत. १२ ते १४ या वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी CoWIN अॅप वर रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. ही लस सर्वांना मोफत दिली जाणार आहे.
(हेही वाचा – नगरसेवकांची मुदत संपताच यांत्रिक झाडूची दिली कंत्राटे )
आजपासून १२ ते १४ वर्षांच्या मुलांचे लसीकरण
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात आजपासून कोविड-१९ साथ आजाराकरीता प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू करण्यात आले आहे. या लसीकरण मोहीमेत आधी प्राधान्य गट, त्यानंतर दिनांक १ मे २०२१ पासून १८ वर्ष वयावरील सर्व नागरिकांचे आणि दिनांक ०३ जानेवारी २०२२ पासून १५ वर्षे वयावरील सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात आजपासून १२ वर्ष पूर्ण ते १४ वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांचे कोविड-१९ लसीकरण करण्यात येणार आहे. प्रायोगिक १२ लसीकरण केंद्रांच्या अभ्यासानंतर इतर सर्व केंद्रांवर १२ ते १४ या वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध शाळा, सामाजिक सेवाभावी संस्था, मंडळे आदींचेही सहकार्य घेतले जाणार आहे. तसेच १२ ते १४ वयोगटातील लाभार्थ्यांची त्या-त्या भागातील लोकसंख्या लक्षात घेऊन त्या लाभार्थ्यांच्या लसीकरणाचे लक्ष करण्यात येणार आहे.
कोण असणार लसीकरणासाठी पात्र?
दिनांक १ जानेवारी २००८ ते दिनांक १५ मार्च २०१० पूर्वी जन्मललेले लाभार्थी पात्र असतील. १२ वर्ष पूर्ण ते १४ वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना Corbevax ही लस देण्यात येणार आहे. या लसीच्या २८ दिवसाच्या अंतरावर दोन मात्रा देण्यात येणार आहे.
१२ वाजेपासून मुंबईतील १२ केंद्रावर लसीकरण
लसीकरण मुंबईतील १२ समर्पित केंद्रावर आज दुपारी १२ वाजता सुरु करण्यात येईल. कोविन प्रणालीत आवश्यक बदल झाल्यानंतर महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रांवर सदर लसीकरण सुविधा उपलब्ध होईल. केंद्र शासनामार्फत कोविन प्रणाली अद्ययावत करण्याचे काम सुरु असल्यामुळे १२ वर्ष पूर्ण न झालेल्या लाभार्थ्यांची देखील लसीकरणासाठी नोंदणी होऊ शकते, परंतु पालकांनी आपल्या १२ वर्ष पूर्ण झालेल्या पाल्याचे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
· १२ ते १४ वर्षे वयोगटासाठी मुंबईतील लसीकरण केंद्रांची यादी
१. ई विभाग – टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि नायर धर्मादाय रुग्णालय, मुंबई सेंट्रल
२. ई विभाग – ग्रँट वैद्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. समूह रुग्णालय, नागपाडा, मुंबई सेंट्रल
३. एफ उत्तर विभाग – लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वसाधारण रुग्णालय, शीव (पूर्व)
४. एफ दक्षिण – राजे एडवर्ड स्मारक (के.ई.एम.) रुग्णालय, परळ
५. एच पूर्व – वांद्रे-कुर्ला संकुल (बी. के. सी.) जंबो कोविड लसीकरण केंद्र, वांद्रे (पूर्व)
६. के पूर्व – सेवन हिल्स रुग्णालय, वांद्रे (पूर्व),
७. के पश्चिम – डॉ. आर. एन. कूपर रुग्णालय, विलेपार्ले (पश्चिम)
८. पी दक्षिण – नेस्को जंबो कोविड लसीकरण केंद्र, गोरेगांव (पूर्व),
९. आर दक्षिण – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मनपा रुग्णालय, कांदिवली (पश्चिम),
१०. एन विभाग – राजावाडी रुग्णालय, घाटकोपर (पूर्व).
११. एम पूर्व विभाग – पंडीत मदनमोहन मालवीय रुग्णालय (शताब्दी रुग्णालय), गोवंडी,
१२. टी विभाग – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर रुग्णालय, मुलुंड
Join Our WhatsApp Community