देशात कोरोनाच्या पहिल्या लाटेत ही महामारी नक्की काय आहे?, कुठून आली?, उपचार काय?, संसर्ग थोपवायचा कसा?, या सर्व प्रश्नांविषयी कमालीचे अज्ञान असतानाही आरोग्य कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून लक्षावधी जनतेचे जीव वाचवले. त्यांचे पंतप्रधानांपासून ते सर्वसामान्यांनी तोंड भरून कौतुक केले. त्यांचा उत्साह वाढावा म्हणून थाळी, टाळी वाजवली, दिवे लावले. मात्र १ वर्ष उलटले आणि कोरोनाची दुसरी भयंकर लाट आली. अशा वेळी जेव्हा कोरोनापासून वाचवण्यासाठी प्रतिबंधात्मक लस आलेली असताना सरकारच्या लसीकरणापासून मात्र आरोग्य कर्मचारी वंचित आहे.
फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण सरकारने सुरु केले खरे, मात्र आता त्याच आरोग्य कर्मचाऱ्यांना जर कोवीन अॅपवर नाव नोंदणी करायची असेल, तर मात्र कोवीन अॅपमध्ये तसा रकानाच नाही. त्यामुळे त्यांनी नोंदणी कुठे करायची, असा प्रश्न आरोग्य कर्मचारी आणि फार्मासिस्टला पडला आहे.
सध्या लसीकरण हे ४५ वयापासून पुढील नागरिकांचे सुरु आहे. त्यामध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांना सामावून घेण्यात आले आहे. यातून ४५ वर्षांपेक्षा कमी वय असलेले आरोग्य कर्मचारी आणि फार्मासिस्ट वंचित राहत आहेत. त्यांना खरे तर कोरोना संसर्गाचा धोका अधिक आहे. आरोग्य सचिवांनी ५ एप्रिल २०२१ रोजी जो आदेश काढला होता, त्याला सरकारचेच कोवीन अॅप स्वीकारत नाही. अर्थात ज्या आरोग्य कर्मचारी, फार्मासिस्ट यांचे वय १८ ते ४४ असेल त्यांची कोवीन अॅपमध्ये नाव नोंदणी होत नाही.
– कैलास तांदळे, अध्यक्ष, महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशन
मागील वर्षी जेव्हा कोरोना महामारीची सुरुवात झाली, तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः आरोग्य कर्मचाऱ्यांचे तोंड भरून कौतुक केले. त्यांचा उत्साह वाढावा यासाठी देशवासियांना थाळी, टाळी वाजवायला सांगितली, दिवे लावायला सांगितले.
त्यानंतर ३ मे २०२० रोजी कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयातील कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्याच्या हेतूने वायू सेनेच्या हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली.
कालांतराने देशात कोरोना नियंत्रणात येऊ लागला, सर्व व्यवहार हळूहळू पूर्ववत होऊ लागले. सर्वत्र सण -उत्सव साजरे होऊ लागले. त्यावेळी भारताने इतिहास घडवला. जागतिक पातळीवर अनेक देश कोरोनावर प्रतिबंधात्मक लस निर्मितीसाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत असताना भारताने मात्र सर्वात अधिक परिणामकारक लसीची निर्मिती केली. त्याचा पहिला डोस १६ जानेवारी २०२१ रोजी एका कोरोना योद्ध्याला देण्यात आला. तेव्हा लसीकरणाच्या पहिल्या दिवशीच २ लाखाहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्याचे लसीकरण करण्यात आले. आता ४५ वर्षांपुढील सरसकट सर्व नागरिकाचे लसीकरण केले जात आहे. मात्र यामध्ये ४५ वर्षांपेक्षा कमी वयाचे कोरोना योद्धा यापासून वंचित राहत आहेत. त्यांना सरकारचे कोवीन अॅप वयाच्या अटीवरून नाकारत आहे.
Join Our WhatsApp Community