कोरोनाचा कहर : लाट लवकर ओसरली नाही, तर कब्रस्तानातही जागा अपुरी पडेल! 

मुस्लीम वस्तीत अनेक जण चाचणी करण्यासाठी पुढे येत नाहीत, तर काही जण घरीच उपचार घेताना दिसत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे कोरोनाने घरीच मृत झालेल्यांची नोंदणीही कब्रस्तानात नैसर्गिक मृत्यू म्हणून होत आहे.

कोरोनच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट ही अतिशय भयानक आहे. लागण झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण होत आहे. यात मृतांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे या भयंकर लाटेत जे कुणी नियम पाळणार ते सुरक्षित राहणार आहेत. मात्र तरीही या कोरोनाचा प्रादुर्भाव जलद गतीने होत आहे. हा कोरोना गरीब-श्रीमंत, जात-धर्म काहीही पाहत नाही. त्यामुळे जसे हिंदू स्मशानभूमीत कोरोनाने मृत रुग्णांचे शव येत आहेत, तसेच ते मुस्लीम धर्मियांच्या कब्रस्तानातही येत आहेत. त्यामुळे ही लाट जर लवकर ओसरली नाही, तर कब्रस्तानातही जागा अपुरी पडेल!

नालासोपारा (पूर्व) येथील मुस्लीम संख्या अधिक असलेल्या भागात कोरोनाबाधित रुग्ण संख्या वाढत आहे. तसेच दिवसाला ४-५ कोरोनाने मृत्यू होत आहेत, मात्र ते ज्येष्ठ नागरीक आहेत. ही नोंदणी केलेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. नोंदणी न केलेल्या कोरोनाबाधित मृत रुग्णांची संख्या अधिक असेल. परंतु सध्या या भागात कब्रस्तानात जागा अपुरी पडत नाही, आजूबाजूचे ट्रस्ट एकमेकांना सहकार्य करतात, मात्र तरीही ही लाट लवकर ओसरली नाही, तर मात्र परिस्थिती बिकट होईल. सध्या रमजानचा उपवासाचा महिना सुरु असल्याने ४५ पेक्षा अधिक वयाचे मुस्लीम नागरीक कोरोना लस घेण्यासाठी जात नाहीत, कारण ती लस घेतल्यावर २ दिवस त्याचा शरीरावर परिणाम राहतो, तरीही आम्ही नागरिकांना लस घेण्यासाठी विनंती करतो.
– समीर डाबरे, नगरसेवक, वसई-विरार महापालिका.

मालेगावात पुन्हा मृत्यूचा कहर! 

मागच्या कोरोनाच्या पहिल्या लाटेत नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील मुस्लीम कब्रस्तानात मृतदेह दफन करायला जागा अपुरी पडत होती, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याचा उलगडा केल्यानंतर ही धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली होती. याच मालेगावात दुसऱ्या लाटेतही रुग्ण संख्या कमी नाही. मात्र अनेक जण चाचणी करण्यासाठी पुढे येत नाहीत, तर काही जण घरीच उपचार घेताना दिसत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे कोरोनाने घरीच मृत झालेल्यांची नोंदणीही कब्रस्तानात नैसर्गिक मृत्यू म्हणून होत आहे. त्यामुळे मालेगाव येथील कब्रस्तानात आणल्या जात असलेल्या मृतांची संख्या या कालावधीत वाढली असली तरी त्यांची नोंद मात्र नैसर्गिक मृत्यू म्हणून केली जात आहे.

(हेही वाचा : आता रेमडेसिवीरवरून केंद्र-राज्यात जुंपली! )

औरंगाबादमध्येही मृतांचा आकडा वाढला!

दरम्यान औरंगाबाद येथेही कोरोनाबाधित रुग्नांची संख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे. याठिकाणी मुस्लीम वस्त्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण घरीच उपचार घेऊन बरे होण्याला प्राधान्य देताना दिसत आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला रुग्ण शोधणे आणि उपचार करणे हे आव्हान बनले आहे. मात्र या ठिकाणीही मृतांची संख्या वाढलेली असून कब्रस्तानात दररोज ३-४ कोरोनाबाधित रुग्णांचे मृतदेह दफन करण्यासाठी आणले जात असल्याने या ठिकाणच्या कब्रस्तानांतील कर्मचाऱ्यांवर ताण आला आहे.

कोरोनाचा मृतदेह दफन करायला १० फूट खोल खोदावा लागतोय खड्डा!

कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णाचा मृतदेह दफन करायचा असेल, तर त्यासाठी किमान १० फूट खोल खड्डा खोदावा लागतो. त्यासाठी सध्या मजूरही कमी पडू लागले आहेत. त्यामुळे आता जेसीबीने खड्डा खॊडला जात आहे. शिवाय कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णाला दफन करण्यासाठी घरातील कुणीही व्यक्ती येत नाही. त्यामुळे परस्पर कब्रस्तानातील कर्मचारी मृतदेहाचे दफन करतात. मात्र आता कब्रस्तानातचा जागा कमी होऊ लागल्याचे चित्र राज्यातील काही ठिकाणच्या कब्रस्तानांमध्ये निर्माण झाल्याने ही लाट लवकर ओसरली नाही, तर मुस्लीम समुदायाच्या कब्रस्तानांची जागा अपुरी पडेल, अशी परिस्थिती आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here