राज्यासह संपूर्ण देशामध्ये सध्या कोरोनाचे संकट असताना आता केंद्र सरकारकडून अनलॉक ४ ची घोषणा करण्यात आली आहे. संपूर्ण देशामध्ये १ सप्टेंबरपासून हा अनलॉक ४ सुरु होणार आहे. अनलॉक ४ ची नियमावली काही वेळापूर्वीच केंद्र सरकारने जारी केली असून, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. तर शाळा महाविद्यालये सप्टेंबर अखेरपर्यंत बंदच राहणार आहेत. यासाठी सरकारने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
मेट्रोला परवनगी
अनलॉक ४ मध्ये मेट्रो 7 सप्टेंबरपासून सुरू करता येऊ शकेल असे केंद्र सरकारने सांगितले आहे. मात्र लोकलबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मात्र घोर निराशा झाली आहे. गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय (एमओएचयूए) तसेच रेल्वे मंत्रालय (एमओआर) व एमएचएच्या चर्चेनंतर मेट्रो रेल्वेला ७ सप्टेंबरपासून श्रेणीबद्ध पद्धतीने ऑपरेट करण्यास परवानगी केंद्र सराकरने दिली आहे. शिवाय व्यक्ती आणि वस्तूंच्या आंतरराज्यीय आणि आंतरराज्यीय हालचालींवर कोणतेही बंधन असणार नाही. अशा हालचालींसाठी स्वतंत्र परवानगी, मान्यता, ई-परवान्याची आवश्यकता भासणार नाही
काय आहेत नवीन नियम
- २१ सप्टेंबरपासून सामाजिक, शैक्षणिक, खेळ, करमणूक, सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्ये आणि इतर मंडळांना १०० जणांच्या कमाल मर्यादेसह परवानगी देण्यात आली आहे. शाळा, कॉलेजेस, शैक्षणिक आणि कोचिंग संस्था बंदच राहतील. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांसोबत झालेल्या सखोल चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्या, नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे शाळा, कॉलेजेस, शैक्षणिक आणि कोचिंग संस्था ३० सप्टेंबरपर्यंत बंदच राहतील. ऑनलाइन आणि डिस्टन्स शिक्षणाला परवानगी देण्यात आली आहे, असे त्यांनी पत्रकात नमूद केले आहे.
- थिएटर, मनोरंजन केंद्र, स्विमिंग पूल बंद राहणार
- शाळा बंद, पण एका वेळी 50 टक्क्याहून कमी शिक्षकांना शाळेत बोलवायला परवानगी
- ऑनलाईन शिक्षणासंदर्भात कामासाठी निम्मे शिक्षक शाळेत जाऊ शकतात.
- नववी ते बारावी च्या विद्यार्थ्यांना त्यांना आवश्यकता असेल त्यावेळी पालकांच्या लिखित पूर्वपरवानगीसह शाळेत यायला परवानगी.
- शिक्षकांकडून मार्गदर्शन, पुस्तके किंवा इतर साहित्य घेण्यासाठी माध्यमिक – शाळेतले विद्यार्थी पालकांच्या परवानगीने शाळेत शिक्षकांना भेटायला जाऊ शकतात.
- वय वर्षं 65 आणि त्यापुढच्या व्यक्तींनी ज्यांना काही आजार आहेत अशांनी आणि 10 वर्षांच्या आतल्या मुलांनी घरातच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गरोदर स्त्रियांनी गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये.