नगरसेवक झाले हैराण… कोविड केंद्रात आयसीयू, व्हेंटिलेटर बेडची केली मागणी!

कोविड काळजी केंद्रातील रुग्ण खाटाही आता कमी पडू लागल्या आहेत. रुग्णांसाठी सध्या ऑक्सिजन बेडचीच मागणी अधिक असून, त्याच रुग्ण खाटा भरल्या जात आहेत.

81

मुंबईमध्ये सध्या प्रत्येक दिवशी सरासरी ९ ते १० हजार कोविड रुग्ण आढळून येत आहेत. या वाढत्या रुग्ण संख्येमुळे रुग्णव्यवस्थेवर प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे आता प्रत्येक नगरसेवक विभागातील कोविड केअर सेंटरमधील सुविधा वाढवण्याची मागणी करत आहेत. त्यामुळे वाढती रुग्ण संख्या आणि नगरसेवकांची मागणी यामुळे कोविड काळजी केंद्र व कोविड रुग्णशय्या वाढवण्यावर प्रशासनाच्यावतीने कार्यवाही सुरू झाली आहे.

मुलुंड-भांडुपमधील नगरसेवकांची मागणी

महापालिकेच्या मुलुंड-टी विभागामध्ये सध्या रुग्ण झपाट्याने वाढत असून, याठिकाणी असलेल्या मिठा नगर कोविड काळजी केंद्रातील रुग्ण खाटाही आता कमी पडू लागल्या आहेत. रुग्णांसाठी सध्या ऑक्सिजन बेडचीच मागणी अधिक असून, त्याच रुग्ण खाटा भरल्या जात आहेत. या केंद्रातील क्षमता संपुष्टात आल्याने याठिकाणी अधिक रुग्णखाटा वाढवणेही शक्य नाही. त्यामुळे मुलुंड जकात नाक्याच्या जवळील केंद्र सुरू करण्याची मागणीही मुलुंड आणि भांडुपमधील नगरसेवकांकडून केली जात आहे.

(हेही वाचाः मुंबईतील सर्व खाजगी तसेच शासकीय महापालिका रुग्णालयांचे होणार ‘अग्निसुरक्षा’ ऑडिट!)

प्रकाश गंगाधरे यांचे आयुक्तांना पत्र

मुलुंडमध्ये रोज ३०० ते ३५० कोविड रुग्ण सापडत आहेत. तेथील उपलब्ध रुग्णालये कमी पडत असून बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन सुविधा यासाठी नागरिकांना धावाधाव करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेने तातडीने कोविड रुग्णालयांची संख्या वाढवावी, अशी मागणी मुलुंडमधील भाजप नगरसेवक प्रकाश गंगाधरे यांनी महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली. अपुऱ्या सुविधेअभावी सर्वसामान्य रुग्णांचा जीव धोक्यात आला आहे. त्याचबरोबर डॉक्टर, नर्स, वैद्यकीय कर्मचाऱ्यांची संख्याही अपुरी आहे. त्यामुळे तातडीने वैद्यकीय कर्मचाऱ्यांची उपलब्धता करणे गरजेचे आहे. याकरता महापालिका प्रशासनाच्यावतीने त्वरित उपाययोजना करुन सर्वसामान्य नागरिकांना वेळीच उपचार द्यावेत, अशी मागणी नगरसेवक गंगाधरे यांनी केली.

मुलुंड जकात नाका येथील कोविड केंद्र सुरू करण्याची मागणी

मुलुंडमधील कोविड सेंटरमध्ये रुग्णांना दाखल करुन घेण्यात येणाऱ्या अडचणींच्या तक्रारी प्राप्त होताच, मुलुंडमधील नगरसेविका रजनी केणी आणि भांडुपमधील नगरसेविका जागृती पाटील यांनी या केंद्राला भेट देऊन पाहणी केली होती. यामध्ये ऑक्सिजन बेडची संख्या वाढवणे कठीण असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी मुलुंड जकात नाका येथील कोविड केंद्र सुरू करण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

(हेही वाचाः लसीकरण वाढवण्यासाठी आता नगरसेवकांचाही हातभार!)

ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढवण्यावर भर

कोविडबाधित रुग्णांची पहिली पसंती ही खाजगी रुग्णालये असून, त्यातही ते काही मोजक्याच रुग्णालयांमध्ये दाखल होण्यासाठी इच्छुक असतात. त्यामुळे सध्या खाटा उपलब्ध होण्याची अडचण भासत असल्याचे चित्र निर्माण होत आहे. खाजगी रुग्णालयांच्या तुलनेत महापालिकेच्या केंद्रांमध्ये रुग्णखाटा रिकाम्याच आहेत. मात्र, यामध्ये ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर बेड रिकामी असण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे आता जनरल बेड ऐवजी ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढवण्यावर भर दिला गेला पाहिजे, असे नगरसेवकांचे म्हणणे आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.