गोरेगाव येथील मृणालताई गोरे उड्डाणपूलाचे राम मंदिर रोड ते रिलीप रोडपर्यंत एस व्ही रोड लगत विस्तारीकरणाच्या कामांमध्ये तब्बल ३१ कोटींनी वाढ झाली आहे. या कामासाठी २०९ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली होती, परंतु आता यामध्ये वाढीव काम झाल्याने याचा खर्च २४० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या पुलाचे बांधकाम दोन नदीच्या पात्रातून करण्यात येत असल्याने यासाठी वापरण्यात आलेल्या स्ट्रक्चरल स्टील बांधकामामुळे तसेच पुलाच्या बांधकामामध्ये मलवाहिनी बाधित झाल्याने त्याची नवीन जोडणी टाकण्यात आल्याने हा खर्च वाढल्याचे बोलले जात आहे. मात्र याचे बांधकाम करण्यासाठी नेमलेल्या सल्लागाराला आधी सव्वा दोन कोटी रुपयांचे सल्ला शुल्क देण्यात आले होते, परंतु या वाढीव कामांमुळे सल्लागाराच्या खात्यात आणखी ६६ लाख रुपयांची भर पडली होती.
मुंबई महापालिकेच्यावतीने गोरेगाव पश्चिम येथील मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या पहिल्या टप्प्यातील काम २०१६मध्ये पूर्ण होऊन त्यांचे लोकार्पण तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालिन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थित झाले होते. या पुलाच्या बांधकामासाठी २५५ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. एमएमआरडीएकडून ही जागा संपादीत केल्यानतर महापालिकेने २००९पासून पुलाच्या बांधकामाला सुरुवात केली. या पुलाच्या बांधकामानंतर या उड्डाणपुलाचे राम मंदिर रोड ते रिलीप रोडपर्यंत एस व्ही रोड लगत विस्तारीत बांधकामाला सुरुवात केली. या विस्तारीत पुलाच्या बांधकामाला प्रत्यक्षात मार्च २०१९पासून सुरुवात झाली.
या विस्तारीत पुलाच्या बांधकामामध्ये जागेची अडचण आणि जलद बांधकाम करण्यासाठी या उड्डाणपुलाचे सुपर स्ट्रक्चर एमएस स्ट्रक्चरल स्टीलने बांधण्यासाठी डिझाईन केले आहे. हा पूल अत्यंत वर्दळीचा रस्ता असलेल्या एस व्ही रोड, राम मंदिर रोड आणि रिलीफ रोड या जंक्शनवरून जात आहे.
या पुलाचे बांधकाम करताना भूमिगत आवश्यक अशा पाण्याच्या पाईप लाईन, एचटी आणि एल टी केबल्स, एमजीएल वाहिन्या, जल वाहिन्या आदी स्थलांतरी पायाभरणीचे कामे करण्यात येत आली. वालभट नदी (राम मंदिर रोड) आणि ओशिवरा नदी (एस व्ही रोड) या दोन प्रमुख नद्यांवर ओलांडून हा पूल जात आहे. त्यामुळे या नद्यांच्या परिसरातील स्ट्रक्चरल स्टील बांधकामाला प्रचंड गंज चढू शकते तसेच या नदीवर भरती व ओहोटीचा परिणाम होत असल्यानेही स्ट्रक्चरल स्टील बांधकाम गंजू शकते. त्यामुळे गंज टाळण्यासाठी तसेच स्ट्रक्चरल स्टीलचे आर्युमान वाढवण्यासाठी या उड्डाणपूलाच्या सुपर स्ट्रक्चरमध्ये स्टेनलेस स्टील गर्डर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे राम मंदिर रोडच्या वालभट नदीवर तसेच एस व्ही रोडच्या ओशिवरा नदी वरील भागात सुपर स्ट्रक्चरमध्ये स्टेनलेस स्टील गर्डर टाकले गेले, तसेच पुलाचे बांधकाम करताना ९00 मी. मी. व्यासाची जुनी मलनि:सारण वाहिनी नव्याने टाकण्याचाही निर्णय घेतला तसेच इतर बाबींचाही समावेश केल्याने हा खर्च वाढल्याचे पुल विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
या विस्तारीत पुलाच्या बांधकामासाठी विविध करांसह २०९. ६४ कोटी रुपयांचे कंत्राट मंजूर केले होते,परंतु हे कंत्राट काम ३१ कोटींनी वाढून आता २४०. ०६ कोटी रुपये एवढे झाले आहे. या पुलाच्या बांधकामासाठी एमईपीएल-ग्यान या संयुक्त भागीदारीतील कंपनीची नियुक्ती केली असून या कंपनीच्या माध्यमातून हे काम सुरु आहे. या पुलाच्या बांधकामासाठी महापालिकेने टीपीएफ या कंपनीची सल्लागार म्हणून काम पाहत आहेत.
या पुलाचे वैशिष्ट्य
- पुलाची लांबी : ७५० मीटर
- पुलाची रुंदी : १५.५० मीटर
- स्पॅन : २९
- पाया बांधकाम : आर.सी.सी. पाईल्स व ओपन फाऊंडेशन
- पुलाचे पृष्ठीकरण : मास्टीक, डीबीएम आणि मास्टीक
(हेही वाचा – मुंबईची तुंबई आता होणार नाही)
Join Our WhatsApp Community