बोरीवली पश्चिम येथील आर.एम. भट्टड मार्ग व एस.व्ही.रोड या जंक्शनवर तसेच कल्पना चावला चौक याठिकाणी बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचा विस्तार करण्यात आला असून, याचा खर्च आता १६१ कोटी रुपयांवरुन विविध करांसह ६५१ कोटींवर पोहोचला आहे.
२०१८ साली देण्यात आले कंत्राट
बोरीवली पश्चिम येथील आर.एम. भट्टड मार्ग व एस.व्ही.रोड या जंक्शनवर आणि कल्पना चावला चौक याठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय २५ सप्टेंबर २०१८ रोजी घेण्यात आला. त्यामुळे स्थायी समितीच्या मान्यतेने एम.ई.पी.एल- स्पेको या संयुक्त भागीदारीतील कंपनीला विविध करांसह १६१ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. या पुलाचे बांधकाम १५ नोव्हेंबर २०१८ रोजी हाती घेण्यात आले. त्यामुळे हे काम पावसाळा वगळून, २४ महिन्यांमध्ये पूर्ण करणे अपेक्षित होते.
(हेही वाचाः मुंबईतील ‘तो’ हिमालय पुन्हा उभा राहणार… होणार साडेसात कोटींचा खर्च!)
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बांधकाम
बोरीवली पूर्व व पश्चिम जोडणाऱ्या जनरल करिअप्पा पूल ते पश्चिम द्रुतगती महामार्ग यांना जोाडणाऱ्या विकास नियोजित रस्त्यावर सुमारे १३५ बांधकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून करिअप्पा उड्डाणपुलाच्या पूर्वेकडील उतार ते पश्चिम द्रुतगती महामार्गापर्यंत उड्डाणपुलाचे बांधकाम पुढे वाढवण्यात आले आहे.
…म्हणून वाढला खर्च
त्यामुळे पश्चिमेकडील लिंक रोडवरील पश्चिम द्रुतगती महामार्ग यांना जोडणारी मुक्त मार्गिका तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. याशिवाय या पुलाचे काम सुरू झाल्यानंतर आयएस कोडमध्ये नवीन सुधारणा लागू झाल्यामुळे, या पुलाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून बेअरींगमध्ये सुधार करणे अत्यावश्यक होते. तसेच कामांच्या ठिकाणी काही स्पॅनच्या लांबीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे या बांधकामांच्या खर्चामध्ये वाढ झाली. त्यामुळे विविध करांसह १६१ कोटींच्या मूळ कंत्राट कामांमध्ये अतिरिक्त वाढ होत, हा खर्च ६५१ कोटींवर जाऊन पोहोचला आहे.
Join Our WhatsApp Community