आश्रय योजना: गोरेगावमधील सफाई कामगारांच्या वसाहतीच्या पुनर्विकासाचा खर्च ९० कोटींनी वाढला

120

मुंबई महापालिकेच्या सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या आश्रय योजनेतंर्गत आता गोरेगाव प्रगतीनगर, मिठानगर येथील प्रकल्पाच्या खर्चात तब्बल ९० कोटी रुपयांनी वाढ झालेली आहे. या प्रकल्पाच्या ३८२.६६ कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली होती, परंतु आता यामध्ये ९० कोटींनी वाढ झाल्याने या प्रकल्पाचा खर्च ४७२ कोटी रुपये एवढा झाला आहे. आजवर प्रकल्प पूर्णत्वास येत असताना खर्चाच्या वाढीला मंजुरी दिली जाते, परंतु प्रकल्पाच्या कामाला सुरुवातही झालेली नसताना याचा खर्च ९० कोटींनी वाढला आणि त्याला महापालिका प्रशासकांनी मंजुरीही दिली आहे.

सफाई कामगारांना चांगल्या सुसज्ज व हवेशीर, मोकळ्या जागेत राहता यावे यासाठी महापालिकेने कामगार वसाहतींचा पुनर्विकासांचे काम आश्रय योजनेतंर्गत हाती घेतले आहे. मुंबई एकूण सफाई कामगारांच्या ४६ वसाहती असून त्यातील ३६ वसाहतींचा पुनर्विकास आश्रय योजनेतंर्गत करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गट ७ मध्ये गोरेगाव प्रगती नगर व गोरेगाव मिठा नगर भागातील सफाई कामगारांच्या वसाहतींचा पुनर्विकास करून ३०० चौरस फुटाच्या अनुक्रमे ६९१ व ४१३ असे एकूण ११०४ तसेच ६०० चौरस फुटाच्या १३० व ४२ असे एकूण १७२ सदनिकांची बांधणी केली जाणार आहे. हे कंत्राट स्काय वे इन्फ्राप्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा प्रस्ताव मंजूर केला.

या कंपनीला ८९.४१ कोटी रुपयांच्या वाढीव खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. स्थायी समितीने ५ ऑक्टोबर २०२१ अन्वये प्रगती नगर येथील ६५०० चौरस मीटर अणि मिठा नगर येथील ३७५० चौरस मीटर एवढे क्षेत्रफळ निश्चित केले होते, परंतु आता या भूखंडाचे क्षेत्रफळ प्रगती नगर येथे ७२०६ चौरस मीटर आणि मिठा नगर येथे ३८३१ चौरस मीटर एवढे निश्चित केले आहे. बांधकाम क्षेत्रफळाच्या झालेल्या वाढीमुळे खर्चात १७.९६ टक्के एवढी वाढ झाली. त्यामुळे याचा बांधकाम कालावधी सहा महिने वाढवून २४ महिन्यांऐवजी ३० महिने एवढा करण्यात आला आहे. हा बांधकामाचा कालावधी वाढवण्यात आल्याने किंमतीच्या फरकाच्या रकमेतही वाढ करण्यात आली आहे.

(हेही वाचा – महापालिकेच्या शाळेत शहरी शेती; कॅनडाच्या दूतावसाने घेतली दखल)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.