पश्चिम उपनगरातील मिलन सब वेच्या ठिकाणी तुंबणाऱ्या पाण्याच्या निचरा करण्यासाठी कायम स्वरुपी तोडगा काढण्यासाठी महापालिकेच्यावतीने साठवण टाकी बनवून पर्जन्य जलवाहिनी टाकून पाण्याचा निचरा करण्याचे प्रकल्प काम हाती घेण्यात आले आहे. यापूर्वी हाती घेतलेले २८ कोटी रुपयांचे काम पूर्ण झाल्यानंतर आता या साठवण टाकींच्या कामांच्या आराखड्यातच त्रुटी राहिल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे उर्वरीत शिल्लक काम करण्यासाठी आणखी २३ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. त्यामुळे मिलन सब वेच्या ठिकाणी हिंदमाताच्या धर्तीवर उभारण्यात येणाऱ्या पाण्याचा निचरा करण्याच्या प्रकल्पाचा खर्च सुमारे ५१ कोटींच्या घरात गेला आहे.
पश्चिम उपनगरातील पावसाळ्यात सर्वात जास्त पाणी तुंबण्याचे प्रमुख ठिकाण म्हणजे मिलन सब-वे. याठिकाणी पाणी तुंबल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यामुळे बऱ्याचदा वाहनांचा मार्ग बदलावा लागतो. त्यामुळे हिंदमाताच्या धर्तीवर मिलन सब वेमधील पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्याची समस्या निवारण करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मिलन सब वेमधील तुंबणाऱ्या पाण्याकरता के पश्चिम विभागातील आरक्षित भूखंडावर तात्पुरत्या स्वरुपात पाणी साठवण्यासाठी साठवण टाकीची व्यवस्था करण्यात येणार आहे. मिलन सब वेमध्ये साचणारे पाणी साठवण टाकीपर्यंत वाहून नेण्यासाठी १२०० मि.मी व्यासाची पावसाळी जलवाहिनी टाकण्यात येणार आहे. ज्याद्वारे पावसाळ्यादरम्यान पाण्याचा निचरा जलद गतीने होईल आणि मिलन सब वेमधील पाणी साचण्याचे प्रमाण कमी होईल. त्यानंतर त्या भूखंडावर बांधण्यात येणारी २० हजार लिटर घनमीटर म्हणजे २ कोटी लिटर क्षमतेची साठवण टाकी आरसीसी स्लॅबने आच्छादित करून भूखंडाची जागा नियमित वापरासाठी केली जाणार आहे. यासाठी सुमारे २८ कोटी रुपये खर्च केले जात आहे. यासाठी महापालिकेने देव इंजिनिअरींग या कंपनीची नियुक्ती केली होती.
त्यानुसार या कंपनीने महापालिकेच्या आराखड्यानुसार काम पूर्ण केले. त्यामुळे मागील पावसाळ्यात पाण्याचा निचरा जलद गतीने होण्यास मदत होत आहे. परंतु हे काम पूर्ण झाल्यानंतर या आराखड्यातच त्रुटी असल्याने यासाठी आणखी काही आवश्यक कामे करण्याची गरज असल्याची बाब समोर आली आहे. हाती घेतलेल्या यापूर्वीच्या कामांदरम्यान काही तांत्रिक बाबी निदर्शनास आल्यामुळे आधीच्या कामांमधील साठवण टाकीचे आरसीसी डिझाईन सुधारीत केले आहे. त्यामुळे आता या कामाचा खर्च आणखी तब्बल २३ कोटींनी वाढला असल्याची माहिती मिळत आहे.
त्यानुसार आता मूळ प्रस्तावानुसार साठवण टाकीचे अंशत: आरसीसी राफ्ट फुंटींग, अंशत: आरसीसी भिंत, टाकचे खांब व आच्छादन स्लॅब उभे करून त्यावर त्या आरक्षित भूखंडाचा वापर खेळासाठी करुन देण्याचे काम आदींचा सामावेश आहे. त्यामुळे या खेळाच्या मैदानाची स्थिती जैसे थे करून मुलांना खेळण्यास ते मैदान सुस्थितीत आणून देण्याचा समावेश असलेल्या या कामांसाठी महापालिकेने निविदा मागवून नव्याने कंत्राटदाराची निवड केली. यामध्ये भारत कंस्ट्रक्शन ही कंपनी पात्र ठरली असून २८ कोटींच्या पहिल्या कामांनंतर आता चुकीच्या आराखड्यामुळे खर्च वाढल्याने आणखी २३ कोटी रुपये खर्च केले जात आहे. त्यामुळे मिलन सब वेच्या कामांचा खर्च सुमारे ५१ कोटींच्या घरात गेला आहे.
(हेही वाचा – मुंबईतील माजी महापौर संशयाच्या घेऱ्यात)
Join Our WhatsApp Community