पूर्णपणे स्वदेशी असलेली कोव्हॅक्सिन ही लस कोरोनावर मात करण्यासाठी ७७.८ टक्के प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. लॅन्सेट या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या फेज तीनच्या अहवालामधून ही माहिती समोर आली आहे. हैदराबादस्थित भारत बायोटेकने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) यांच्या सहकार्याने कोव्हॅक्सिन ही लस विकसित केली आहे. कोव्हॅक्सिन ही लस, कोरोनाची लक्षणे आढळून येणाऱ्यांमध्ये ७७.८ टक्के आणि गंभीर लक्षणांच्या प्रकरणांमध्ये ९३.४ टक्के प्रभावी आहे.
कोव्हॅक्सिन प्रभावी
लॅन्सेटच्या निवेदनानुसार, कोव्हॅक्सिन ही लस लक्षणे नसलेल्या कोरोना रूग्णांमध्ये ६३.४ टक्के, डेल्टा प्रकारांविरुद्ध ६५.२ टक्के आणि SARS-CoV-2 विषाणूच्या सर्व प्रकारांविरुद्ध ७०.८ टक्के प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. त्याच वेळी, गंभीर लक्षणे असलेल्या प्रकरणात ही भारतीय लस ९३.४ टक्के प्रभावी असल्याचे दिसून आले. कोव्हॅक्सिनचे दोन डोस दिल्यानंतर दोन आठवड्यांनी शरीरात कोरोनावर मात करणारे अँटीबॉडीज तयार होतात. यामुळे कोव्हॅक्सिन लस प्रभावशाली आहे. तसेच लस संबंधित मृत्यूची कोणतीही गंभीर प्रकरणे नोंदवली गेली नाहीत. असे, लॅन्सेटच्या निवेदनात स्पष्ट केले आहे.
( हेही वाचा : कोरोनाबाबत गाफील राहू नका! ब्रिटन-फ्रान्सची ‘ही’ झाली अवस्था…)
सर्वात मोठी चाचणी
लॅन्सेटद्वारे प्रकाशित झालेल्या फेज तीनच्या क्लिनिकल ट्रायल डेटा रिव्ह्यूमार्फत आमच्या कार्याला जागतिक मान्यता मिळाली आहे. कोरोनाच्या लसीवर जगात सर्वाधिक चाचण्या झालेल्या आहेत. चाचण्यांच्या क्षमता आणि सुरक्षा अभ्यासामध्ये भारतातील २५ शहरांमधील २५ हजार ८०० स्वयंसेवकांचा समावेश होता. कोव्हॅक्सिन लसीवरील ही भारतातील सर्वात मोठी क्लिनिकल चाचणी होती. असे भारत बायोटेकचे अध्यक्ष कृष्णा इल्ला यांनी स्पष्ट केले. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, ९६ देशांनी जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेल्या लसींना मान्यता दिली आहे. यात कोविशील्ड व कोव्हॅक्सिनचा समावेश आहे.
Join Our WhatsApp Community