टेन्शन! कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस मिळेना! लसीच्या तुटवड्याने केंद्रे बंद! 

आजही किमान ८० हजार लोकांना कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोसची आवश्यकता आहे. पण महापालिकेकडे केवळ ८ हजार लस साठा शिल्लक आहे.

मुंबईमध्ये कोव्हॅक्सिनचा पहिला डोस ज्या नागरीकांनी घेतला, त्यांना आता याच लसीचा दुसरा डोस कुठे आणि कसा मिळेल, असा प्रश्न पडला आहे. ज्या खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रात कोव्हॅक्सिनची लस घेतली होती, त्यातील लसीकरण केंद्रे बंद असल्यामुळे तसेच तिथे आता कोव्हॅक्सिनची लस मिळत नसल्याने, दुसऱ्या डोसची प्रतिक्षा लागली आहे.

रविवारपर्यंत १ लाख ५८ हजार लशींचा साठा होता उपलब्ध

मुंबईत महापालिकेच्या ४२ आणि सरकारी १७ अशी एकूण ५९ लसीकरण केंद्रे, तर खासगी रुग्णलयातील ७३ अशाप्रकारे एकूण १३२ लसीकरण केंद्रे सुरु करण्यात आली आहेत. परंतु कोविड लशीचा साठा मर्यादित असल्याने महापालिका व सरकारी अशा एकूण ५९ केंद्रांच्या तुलनेत सध्या केवळ ३२ लसीकरण केंद्रे सुरु आहेत. तर ७३ खासगी लसीकरण केंद्रांच्या तुलनेत सध्या केवळ ७ लसीकरण केंद्रे सुरु आाहेत. महापालिकेच्या दाव्यानुसार सध्या त्यांच्याकडे कोविशिल्डच्या १ लाख  ५० हजार, तर कोव्हॅक्सिनच्या लसीच्या ८ हजार याप्रकारे एकूण १ लाख ५८ हजार लशींचा साठा रविवारपर्यंत उपलब्ध होता.

(हेही वाचा : महापालिकेच्या निष्काळजीपणामुळे भाभा रुग्णालयात ऑक्सिजन टाकी रिकामी!)

८० हजार लोकांना कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोसची आवश्यकता

मात्र, आजच्या घडीला अनेक खासगी रुग्णालयातील लसीकरण केंद्रांमध्ये नागरीकांनी पहिला डोस घेतला असून सध्या ही केंद्रेच बंद असल्याने दुसरा डोस कसा घ्यावा, असा प्रश्न त्यांना पडला आहे. कोविशिल्डची लस असल्यास तो प्रश्न निकाली पडू शकतो. परंतु अनेक नागरीकांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला असून ज्या लसीकरण केंद्रात हा डोस घेतला होता तिथे आता तो उपलब्ध नाही किंबहुना ते केंद्र बंद झाले आहे. मग कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस कसा घ्यावा, असा प्रश्न नागरीकांना पडला आहे. आतापर्यंत महापालिकेच्या नोंदीनुसार मुंबईत जे एकूण लसीकरण पार पडले आहे, त्यामध्ये २० लाख ९१ हजार ७३६ या कोविशल्डच्या लस आहेत. तर १ लाख ४५ हजार ५४७ लस या कोव्हॅक्सिनचा आहेत. यामध्ये १ लाख १२ हजार ४४० नागरीकांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला आहे. तर ३३ हजार १०७ लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. रविवारी झालेल्या लसीकरणामध्येही ५३४ लोकांनी पहिला डोस, तर १,४२३ लोकांनी कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस घेतला. त्यामुळे आजही किमान ८० हजार लोकांना कोव्हॅक्सिनचा दुसरा डोसची आवश्यकता आहे. पण आजच्या घडीला महापालिकेकडे केवळ ८ हजार लस साठा शिल्लक आहे. मात्र, हा साठा दुसऱ्या डोससाठी राखीव असतानाही महापालिकेकडून पहिल्या डोससाठी तो देत असल्याची आकडेवारीवरून स्पष्ट होते.

७ खासगी लसीकरण केंद्रावरच कोव्हॅक्सिन

सध्या जी ७ खासगी लसीकरण केंद्रे सुरु आहेत, तिथे कुठेही कोव्हॅक्सिनची लस दिली जात नाही. तर नायर, कस्तुरबा, जे.जे. रुग्णालय, वरळी इएसआयएस रुग्णालय, सांताक्रुझ व्ही.एन. देसाई रुग्णालय आणि कांदिवली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी ठिकाणीच कोव्हॅक्सिनचीही लस दिली जाते.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here