मुंबईत कोरोनाचा पारा उतरला

मुंबईत मागील दोन दिवसांपासून कमी होत असलेला कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा सोमवारी आणखी कमी झाला आहे.  रविवारी जिथे २ हजार ४०३ रुग्ण आढळून आले होते, तिथे सोमवारी १ हजार ७९४ रुग्ण आढळून आले आहेत. तर सोमवारी ७४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोमवारपर्यंत एकूण उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या ४५ हजार ४३४ एवढी आहे.

अशी आहे आकडेवारी

सोमवारी दिवसभरात एकूण २३ हजार ६१ जणांची कोविड चाचणी करण्यात आली. तसेच ३ हजार ५८० रुग्ण बरे होऊन घरी परतले. मात्र, रविवारी जिथे मृतांचा आकडा ६८ होता, तिथे सोमवारी मृतांचा आकडा ७४ एवढा झाला. यामध्ये ५१ रुग्ण हे दीर्घकालीन आजाराचे होते. यामध्ये ४६ पुरुष आणि २८ महिला रुग्णांचा समावेश आहे. चाळीशीच्या आतील तीन रुग्णांचा समावेश आहे, तर ६० वर्षांवरील ४४ रुग्ण आणि ४० ते ६० वयोगटातील मृत रुग्णांची संख्या २७ एवढी आहे.
मुंबईत सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ९१ टक्के एवढा आहे. मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा दर हा १६३ दिवसांवर आला आहे. तसेच संपूर्ण मुंबईत ४९३ इमारती सिल तथा मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये असून, झोपडपट्टी व चाळींची संख्या ही ८७ एवढी आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here