मुंबईत कोरोनाचा बॉम्ब फुटला… दिवसभरात ५ हजार १८५ रुग्ण सापडले!

चार दिवसांपासून तीन हजारांच्या घरात असलेल्या रुग्ण संख्येने पाच ते सहा दिवसांमध्येच पाच हजारांचा पल्ला गाठल्याने मुंबईचा धोका अधिक वाढला आहे.

मुंबईमध्ये दिवसेंदिवस वाढत असणारा कोरोना रुग्णांची संख्या ही वाढता वाढता वाढे होत चालली आहे. बुधवारी कोरोना रुग्णांचा आता विस्फोट झाला असून, बुधवारी एकाच दिवशी तब्बल ५ हजार १८५ रुग्ण आढळून आले आहेत. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळून आल्याने मुंबईतील कोरोनाचा धोका अधिकच वाढला आहे. त्यामुळे मुंबई हा कोरोनाचा प्रमुख हॉटस्पॉट निर्माण झाला असून, सरकारला आता मुंबईत कडक निर्बंध आणण्याशिवाय गत्यंतर राहिलेले नाही.

धोका वाढला

मुंबईत मंगळवारी ३ हजार ५१२ रुग्ण आढळून आलेले असतानाच, बुधवारी या रुग्ण संख्येचा आकडा दीड हजाराने वाढून ५ हजार १८५ वर पोहोचला आहे. त्यामुळे एकाच दिवसांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात संख्या वाढल्याने महापालिकेच्या आणि सरकारच्या उरात धडकी भरली आहे. मागील चार दिवसांपासून तीन हजारांच्या घरात असलेल्या रुग्ण संख्येने पाच ते सहा दिवसांमध्येच पाच हजारांचा पल्ला गाठल्याने मुंबईचा धोका अधिक वाढला आहे. त्यामुळे एकूण रुग्णांचा आकडा ३ लाख ७४ हजार ६११ एवढा झाला आहे.

(हेही वाचाः पुणेकरांनो… यंदा तुम्हीही ‘रंग’ उधळू नका!)

मृत्यूचा आकडा स्थिर

मुंबईत बुधवारी दिवसभरात २ हजार ८८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. रुग्णांची संख्या वाढली असली तरी मृत्यूचा आकडा मात्र स्थिर आहे. दिवसभरात ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे सहा रुग्ण दीर्घकाळ आजारी होते. त्यातील ५ जणांचे वय हे ६० वर्षांवरील होते. मंगळवारी रुग्ण दुपटीचा दर हा ९० दिवसांचा होता, तर बुधवारी हा दर ८४ दिवसांवर आला होता. दिवसभरात झोपडपट्ट्या तसेच चाळींच्या सक्रिय कंटेनमेंट झोनची संख्या ३९ एवढी आहे, जी मंगळवारी ३८ होती. तर सक्रिय सीलबंद इमारती मंगळवारी ३६३ होत्या, त्या बुधवारी ४३२ एवढ्या झाल्या आहेत.

एकाच दिवशी दादर,माहिम आणि धारावीत २१२ रुग्ण

मागील काही दिवसांपासून नियंत्रणात असलेल्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा दादर, माहिम आणि धारावी या जी-उत्तर विभागांमध्ये पुन्हा एकदा वाढू लागली आहे. बुधवारी दिवसभरात तब्बल २१२ रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक माहिममध्ये ८६ रुग्ण तर धारावी व दादरमध्ये अनुक्रमे ६२ व ६४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जी-उत्तर विभागातील एकूण रुग्णांची संख्या १५ हजार ७४७ एवढी झाली आहे.

(हेही वाचाः मुंबईत आता सुगंध देणारी ‘कचरापेटी’!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here