१ एप्रिलपासून माहिम,दादर आणि धारावी या जी-उत्तर विभागात दररोज तिनशेच्या घरात जाणारी रुग्णसंख्या आता आटोक्यात येताना दिसत आहे. मागील दोन दिवसांपासून या विभागात एकूण रुगसंख्या ही शंभरच्याही खाली उतरली आहे. विशेष म्हणजे धारावीतील वाढणारी रुग्णसंख्या त्वरित नियंत्रणात आली असली, तरी माहिम आणि दादरमधील रुग्ण संख्या शंभरच्यावर जात असल्याने चिंता व्यक्त केली जात होती. पण आता दादर व माहिममधील संख्या ३० ते ४०च्या आत स्थिरावल्याने येथील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
असा आहे रुग्णसंख्येचा आलेख
जी-उत्तर विभागात २१ मार्च रोजी एकूण ८९ रुग्ण आढळून आले होते. यामध्ये दादर २९, धारावी १६ आणि माहिम ४४ अशाप्रकारे रुग्ण संख्या होती. परंतु २२ मार्च रोजी ही संख्या अचानकपणे वाढून दुप्पट झाली होती. २२ मार्च रोजी एकूण १६८ रुग्ण आढळून आले होते. त्यामध्ये दादर ५७, धारावी ४० आणि माहिम ७१ असे रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर रुग्णसंख्येचा आकडा वाढतच गेला. १ एप्रिल रोजी हा आकडा २७९ वर पोहोचला होता. यामध्ये दादर व व माहिममध्ये अनुक्रमे १०४ व १०१ असे रुग्ण आढळून आले होते. तर धारावीमध्येही ७१ रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे पुन्हा एकदा धारावी रौद्ररुप धारण करते की काय, असे वाटत असताना जी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर आणि त्यांच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सर्वच विभागीय कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा झोकून देत, रुग्ण संख्या नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.
(हेही वाचाः धक्कादायक… अवघ्या पाच दिवसांत लालपरीच्या २६ कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू!)
टप्प्याटप्प्याने संख्या झाली कमी
१९ एप्रिलपर्यंत वाढणारी ही संख्या टप्याटप्याने कमी होऊ लागली. १९ एप्रिल रोजी दिवसभरात २४५ रुग्ण आढळून आले होते, तर ही संख्या मागील दोन दिवसांपासून कमी होत, आता शंभरच्या आतमध्ये आली आहे. मंगळवारी २७ एप्रिल रोजी दिवसभरात केवळ ८४ रुग्ण आढळून आले. यामध्ये धारावी १४, दादरमध्ये ३६ आणि माहिममध्ये ३० रुग्ण आढळून आले आहेत. सध्या या संपूर्ण विभागात एकूण ५७३१ रुग्णांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.
Join Our WhatsApp Community