गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने घट होताना दिसत आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्याच दिवशी राज्यभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत कमालीची घट नोंदवली गेली आहे. सलग दुस-या दिवशी ही लक्षणीय घट झाल्याने राज्याच्या दृष्टीने ही आनंदाची बातमी समजली जात आहे.
कशी आहे रुग्णसंख्या?
मंगळवार १ फेब्रुवारी रोजी राज्यात १४ हजार ३७२ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर तब्बल ३० हजार ९३ रुग्ण बरे होऊन घरी परतले. त्यामुळे बरे होणा-या रुग्णांची संख्या ही नव्या नोंदीहून दुप्पटीने जास्त नोंदवली गेली आहे. फेब्रुवारी महिन्याच्या पंधरवड्यापर्यंत ओमायक्रॉन विषाणूची तिसरी लाट आटोक्यात येत असल्याची सुखद वार्ता असतानाच, आता राज्यभरातील कोरोना रुग्णसंख्या कमीच होत राहील, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाचे सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.
…तरीही सावधगिरी बाळगा
आता रुग्ण बरे होण्याचा टक्काही वाढला असून, मंगळवारी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६३ टक्क्यांवर नोंदवले गेले. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्याला तीन लाखांपर्यंत पोहोचलेली रुग्णसंख्या आता १ लाख ९१ हजार ५२४ पर्यंत खाली घरसली आहे. मृत्यूच्या नोंदीत वेळेवर उपचारासाठी न येणा-या रुग्णांना गमावल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिका-यांनी दिली. तिसरी लाट यशस्वीरित्या कमी वेळेत आटोक्यात येत असली तरीही गंभीर आजार असलेल्या रुग्णांनी आपल्या आजारावरील उपचार आणि औषधे वेळेवर घ्यावीत, लसीकरण पूर्ण करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
Join Our WhatsApp Community