राज्यातील कोविड मृतांची संख्या पार करणार ‘हा’ आकडा

आतापर्यंत राज्यात कोविडमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 99 हजार 512 इतकी झाली आहे.

राज्यात कडक निर्बंध लागू केल्यापासून, कोरोना रुग्णांचा उतरता आलेख पहायला मिळत आहे. असे असले तरी राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या, ही लाखांच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे. रविवारी राज्यात ही संख्या लाखांच्या पार जाऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. तसेच कोविड मृत्यूंची सर्वाधिक संख्या असलेल्या जगातील सात देशांमध्ये भारताचा समावेश होत आहे. एकट्या महाराष्ट्र राज्यातील कोरोना मृत्यूंची संख्या ही फ्रान्सच्या एकूण मृतांच्या संख्येच्या जवळपास पोहोचली आहे. फ्रान्समध्ये आतापर्यंत 1 लाख 9 हजार नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे.

शनिवारी सर्वात कमी रुग्णसंख्या

देशात कोरोनाची दुसरी लाट आल्यापासून राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढायला सुरुवात झाली होती. त्यानंतर राज्य सरकारने यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कडक पावले उचलत, ब्रेक दि चेन अंतर्गत निर्बंध घातले. त्याचा परिणाम दिसून येत असून, शनिवारी राज्यात गेल्या तीन महिन्यांतील सर्वात कमी संख्या आढळून आली. शनिवार 5 जून रोजी राज्यात एकूण 13 हजार 659 कोविडबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 300 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत राज्यात कोविडमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 99 हजार 512 इतकी झाली आहे.

(हेही वाचाः दुसऱ्या लाटेत उसंती मिळताच कोविड सेंटरची डागडुजी सुरु!)

मृतांची संख्या कमी होणार

गेल्या दोन आठवड्यांपासून राज्यात कोविडबाधित रुग्णांचा आकडा हा सातत्याने कमी होताना दिसत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत मृत्यूंची संख्याही कमी व्हायला सुरुवात होईल, असे राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात येत आहे.

मुंबईतही कोरोनाचा पारा उतरला

मुंबईतही कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा गेले चार दिवस सातत्याने कमी होताना दिसत आहे. शनिवारी मुंबईत ८६६ रुग्ण आढळून आले असून, संपूर्ण दिवसभरात २९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत शनिवारपर्यंत १६ हजार १३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच बरे होणाऱ्या रुग्णांचा दर हा ९५ टक्के एवढा आहे. तर रुग्ण दुप्पटीचा दर हा ५११ दिवसांवर आला आहे.

(हेही वाचाः )मुंबईतील रुग्ण संख्या हजाराच्या आतच! 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here