बुधवारी राज्यात कोरोनावर यशस्वी उपचार केलेल्या रुग्णांचा आलेख बराच उंचावला आहे. तब्बल ४६ हजार ५११ कोरोना रुग्णांना एका दिवसांत डिस्चार्ज दिला गेला. त्यामुळे राज्यभरातील सक्रीय रुग्णांच्या संख्येत नियंत्रण राहिल्याचे सकारात्मक चित्र पाहायला मिळाले.
मुंबईतील सक्रीय रुग्ण राज्याच्या तुलनेत ५० टक्के
बुधवारच्या नव्या नोंदीचा आकडा पुन्हा चाळीशीपार गेला असला तरीही डिस्चार्ज रुग्णांच्या संख्येने कोरोनाच्या सक्रीय रुग्णांत घट झाल्याने आरोग्य विभागाने सुस्कारा सोडला. मात्र पुण्यात बुधवारीही राज्यभरातील सक्रीय रुग्णांच्या तुलनेत रुग्णांची आकडेवारी जास्त दिसून आली. बुधवारी पुण्यात ६८ हजार ८३४ कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली. ठाण्याचा दुसरा क्रमांक लागला. ठाण्यात ५५ हजार ५७० कोरोना रुग्णांवर तर त्याखालोखाल मुंबईत केवळ ३१ हजार ८५६ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तिस-या लाटेच्या आगमनाच्यावेळी मुंबईत राज्याच्या एकूण सक्रीय रुग्णांपैकी ५० टक्के रुग्ण आढळून आले होते. मात्र मुंबईने कमी दिवसांत वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणली.
(हेही वाचा येऊरमध्ये आढळला बिबट्याचा मृतदेह)
नागपूर, रायगड आणि नाशकावर नजर
पुणे, ठाणे, मुंबई वगळता नागपूर, रायगड आणि नाशकात रुग्णसंख्या आता वाढत आहेत. रायगडमध्ये १५ हजार ७७४, नागपूरात १४ हजार २२६ आणि नाशकात १२ हजार ७५९ कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
राज्यात एका दिवसांत ४९ रुग्णांचा मृत्यू
मुंबईत १२, वसईविरारमध्ये ५, रायगडात ४, नवी मुंबईत ३, कल्याण डोंबिवलीत २, मीरा-भाईंदरमध्ये २, अहमदनगरमध्ये २, पुणे आणि सोलापूरात ५, पिंपरीचिंचवडमध्ये १, तसेच सातारा, सोलापूर, सांगली आणि सिंधुदुर्गात, नांदेड आणि चंद्रपूरात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला.
- राज्यातील आतापर्यंतच्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या – ७३ लाख २५ हजार ८२५
- राज्यात आतापर्यंत कोरोना उपचारातून बरे झालेले रुग्ण – ६९ लाख १५ हजार ४०७