कोरोनासंबंधीची स्थिती केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. देशात दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत आहे अवघ्या 10 दिवसांत देशातील कोरोना रुग्णवाढीचा वेग दुप्पट झाला आहे. दहा दिवसांपूर्वीच देशात 1 लाख नव्या रुग्णांची नोंद झाली होती. आता हीच संख्या 2,00,739 वर जाऊन पोहोचली आहे. गेल्या 24 तासांमध्ये हे नवे रुग्ण नोंदवण्यात आले आहेत. त्यामुळे देशातही लॉकडाऊन लावण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
येत्या ५ दिवसांत ३ लाख रुग्ण संख्या होईल!
आतापर्यंत कोरोनाच्या नव्या लाटेत केवळ अमेरिकेतच दिवसाला 2 लाख नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. परंतू अमेरिकेत एक लाखापासून ते दोन लाखापर्यंत रुग्ण संख्या होण्यासाठी 21 दिवस लागले होते. भारतात मात्र अवघ्या 10 दिवसांतच कोरोना रुग्णवाढीचे प्रमाण दुप्पटीने वाढले आहे. अमेरिकत 8 जानेवारीला एकाच दिवसात 3,09,035 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती. भारताचा सध्याचा वेग पाहता भारत हा आकडा येत्या पाच दिवसांत गाठेल, अशी शक्यता आहे. ही शक्यता खरी ठरल्यास ही भारतासाठी मोठी चिंताजनक बाब असेल.
(हेही वाचा : आता प्रत्येकाला घरोघरी जाऊन ‘लसवंत’ करणार? केंद्र सरकारकडे प्रस्ताव)
देशात्र लॉकडाऊन लावण्याची शक्यता!
दरम्यान देशातील वाढती रुग्ण संख्या पाहता देशात लॉकडाऊन लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आता आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा करत आहेत. ही संख्या कमी करणे आणि लसीकरणाचा वेग वाढवणे यासाठी काय करता येईल, याकरता पंतप्रधान त्याविषयी गांभीर्याने विचार करत आहेत. गेल्या 24 तासांत देशभरात 1,038 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाला आपत्ती म्हणून जाहीर करण्याची मागणी!
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घातले आहे. कोरोनाचा कहर वाढत आहे, त्यामुळे कोरोनाला आपत्ती म्हणून घोषित करा आणि त्याप्रमाणे राज्यांना अर्थसहाय्य करा, अशी मागणी केली आहे. दरम्यान राज्यात १४ एप्रिल, रात्री ८ वाजल्यापासून संचारबंदी करण्यात आली आहे. संचारबंदीच्या पहिल्या दिवशी अर्थात १६ एप्रिल, गुरुवारी बऱ्यापैकी गर्दी ओसरलेली दिसली. मात्र आता मुख्यमंत्री यांच्याकडे विविध समाजघटक समोर येऊन आर्थिक पॅकेजमध्ये सहभागी करून घेण्याची मागणी करू लागले आहेत. माथाडी कामगारांना मुख्यमंत्री ठाकरे यांनी अर्थसहाय्य घोषित केले नाही, त्यांना अर्थसहाय्य घोषित करावे, अशी मागणी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केली आहे, तर चित्रीकरणही बंद केल्यामुळे चित्रपट आणि मालिकांच्या चित्रीकरणात सहभागी आणि हातावर पोट असलेल्या कामगारांसाठीही अर्थसहाय्य करावे, अशी मागणी केली आहे.
Join Our WhatsApp Community