कोरोनाबाबत गाफील राहू नका! ब्रिटन-फ्रान्सची ‘ही’ झाली अवस्था…

भारताने या दोन देशांकडून धडा घेण्याची गरज आहे. येथील जनतेने कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळावेत, अन्यथा येथेही तिसऱ्या लाटेचा धोका नाकारता येत नाही.

देशात कोरोनापासून मोठा दिलासा जरी मिळाला असला तरी, काही लोक अगदीच निष्काळजीपणे वागत आहेत, अनेक लोक मास्कचा वापरही करत नाहीत. कोरोना महामारी आता संपली आहे, असे समजून बरेच लोक प्रतिबंधाचे सामान्य नियम पाळत नाहीत. पण अशा लोकांसाठी ब्रिटन आणि फ्रान्समध्ये कोरोना महामारीमुळे झालेला विध्वंस हा धडा आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाच्या चौथ्या लाटेने कहर केला असताना फ्रान्समध्ये पाचव्या लाटेने खळबळ उडवून दिली आहे. या दोन युरोपीय देशांमध्ये या महामारीने भूतकाळात कहर केला होता आणि पुन्हा एकदा त्याच्या संसर्गामुळे लोकांचे आरोग्य आणि जीव धोक्यात आला आहे.

ब्रिटनची स्थिती

जूनमध्ये ब्रिटनमध्ये कोरोनावरील निर्बंध उठवल्यानंतर चौथी लाट सुरू झाली, जी अजूनही कहर करत आहे. यापूर्वी त्याचा जोर कमी असला तरी ऑक्टोबर महिन्यापासून पुन्हा एकदा या लाटेचा कहर सुरू झाला आहे. येथे दररोज सरासरी ४० हजार रुग्ण आढळत आहेत. यासोबतच दररोज दोनशे लोकांचा मृत्यू होत आहे. १० नोव्हेंबर रोजी येथे एकाच दिवसात ३९ हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळले.

फ्रान्सची स्थिती

फ्रान्समध्ये ४ ऑक्टोबरपासून पाचव्या लाटेचा उद्रेक सुरू आहे आणि दररोज सरासरी १० हजार रुग्ण आढळत आहेत, तर ४० हून अधिक लोकांचा मृत्यू होत आहे. १० नोव्हेंबर रोजी फ्रान्समध्ये ११ हजारांहून अधिक रुग्ण आढळले, तर ३३ जणांचा मृत्यू झाला.

( हेही वाचा : कार्तिकी वारी : एसटीचा संप रेल्वेचा मात्र दिलासा )

लसीकरणामुळे धोका कमी होतो

या दोन्ही देशांमध्ये लसीकरण वेगाने सुरू आहे. असे असतानाही कोरोनाचा संसर्ग शिगेला पोहोचला आहे. मात्र, लसीकरणाचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे गंभीर रुग्णांची संख्या कमी असून मृतांचा आकडाही नियंत्रणात आहे. फ्रान्समध्ये १ हजार ७६ रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत, तर ब्रिटनमध्ये अशा रुग्णांची संख्या १ हजार २२ एवढी आहे.

भारताने धडा घेण्याची गरज आहे

भारताने या दोन देशांकडून धडा घेण्याची गरज आहे. येथील जनतेने कोरोनाचे नियम काटेकोरपणे पाळावेत, अन्यथा येथेही तिसऱ्या लाटेचा धोका नाकारता येत नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here