यंदा गरबा खेळता येणार? वाचा नवरात्रोत्सवासाठी सरकारच्या मार्गदर्शक सूचना

85

यंदा 7 ते 15 ऑक्टोबर दरम्यान नवरात्रोत्सव आणि दसरा हे सण साजरे करण्यात येणार आहेत. नवरात्राच्या पहिल्या दिवसापासून राज्य शासनाने राज्यातील मंदिरे आणि सर्व धार्मिकस्थळे उघडण्यासाठी परवानगी दिली आहे. पण अजूनही कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्यामुळे या उत्सवांदरम्यान नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी करणे टाळावे व उत्सव साजरे करताना योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.

यासाठी गृह विभागाकडून नवरात्रोत्सवासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये गरबा व दांडिया यांना परवानगी नाकारण्यात आली आहे.

(हेही वाचाः यंदाही गरबा-दांडियाशिवाय नवरात्रोत्सव! )

मार्गदर्शक सूचना

  • ब्रेक दि चेन अंतर्गत असलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे.
  • सार्वजनिक नवरात्रोत्सवासाठी मंडळांनी महापालिका किंवा स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे अत्यावश्यक आहे.
  • देवीच्या मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळांसाठी 4 फूट तर घरगुती मूर्ती ही 2 फूट उंचीपर्यंत असावी.
  • देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. तसेच विसर्जनापूर्वीची आरती ही घरीच करावी.
  • मंडपांसाठी स्थानिक प्रशासन किंवा महापालिकेने केलेल्या धोरणांनुसारच मंडप उभारण्यात यावेत.
  • गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करू नयेत. त्याऐवजी रक्तदान शिबिरांसारख्या अन्य शिबिरांचे आयोजन करावे.
  • विविध माध्यमांतून देवीच्या दर्शनाची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्याकडे भर द्यावा.

(हेही वाचाः घट बसणार, मंदिरे उघडणार! राज्य सरकारचा मोठा निर्णय)

  • मंडपात एकावेळी 5 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची गर्दी नसावी. तसेच खाद्यपदार्थ अथवा पेयपानाची व्यवस्था करण्यास सक्त मनाई आहे.
  • आरती, भजन, किर्तन यावेळी गर्दी होणार नाही याकडे लक्ष द्यावे.
  • उत्सव साधेपणाने साजरा करायचा असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक मंडळांनी देवीच्या मूर्तीची सजावट साधेपणाने करावी.
  • विसर्जनासाठी स्थानिक प्रशासनाने तयार केलेल्या कृत्रिम तलावांचा जास्तीत-जास्त वापर करावा.
  • विसर्जनाच्या दिवशी घरगुती तसेच सार्वजनिक मंडळांचा परिसर प्रतिबंधीत क्षेत्रात असेल तर मूर्तीचे विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करता येणार नाही.
  • दस-याच्या दिवशी रावण दहनाचा कार्यक्रम मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत पार पाडावा.
  • तसेच उत्सवादरम्यान स्थानिक प्रशासन किंवा राज्य सरकारकडून वारंवार देण्यात येणा-या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.