कोरोना संसर्ग : लहान मुलांसाठी टास्क फोर्सची बैठक! 

केंद्र सरकारने या आधीच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. तसेच त्यामध्ये लहान मुलांना अधिक धोका असणार आहे, असेही म्हटले आहे.

147

कोरोनच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या संख्येने लहान मुलांनाही संसर्ग झाला आहे. महाराष्ट्राच्या बाजूच्या राज्यात कर्नाटकमध्ये ९ वर्षांखालील तब्बल ४० हजार लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातही लहान मुलांना जास्त प्रमाणात लागण होणार आहे. ही शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकार रविवार, २३ मे रोजी पहिल्यांदा लहान मुलांच्या कोरोना संसर्गाबाबत तयारी करण्यासाठी टास्क फोर्सची बैठक घेणार आहे.

लहान मुलांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर! 

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा तितका संसर्ग झाला नसल्याचे आढळून आले, मात्र तरीही ग्रामीण भागात पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग अधिक झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे राज्य सरकारने आतापासूनच लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्यास खबरदारीच्या उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी त्यांच्याकरता स्वतंत्र कोविड केअर सेंटर उभारण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत नेस्को कोविड सेंटरमध्ये लहान मुलांसाठी ५०० बेडचे कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. बुलढाण्यातही लहान मुलांसाठी रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड उभारण्यात येणार आहे. औरंगाबादमध्ये १० दिवसांत २१० लहान मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. 

(हेही वाचा : धक्कादायक! एअर इंडियाच्या 45 लाख प्रवाशांच्या डेटाची चोरी! )

तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका! 

केंद्र सरकारने या आधीच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली आहे. तसेच त्यामध्ये लहान मुलांना अधिक धोका असणार आहे, असेही म्हटले आहे. म्हणूनच राज्य सरकारने लहान मुलांवर उपचार करता येथील त्यादृष्टीने तयारी सुरु केली आहे. लहान मुलांच्या चेहऱ्याच्या मापाप्रमाणे ऑक्सिजन मास्कही बनवण्याचा विचार सुरु आहे. या सर्वांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रविवार, २३ मे रोजी टास्क फोर्सची बैठक घेणार आहेत, अशी माहिती समजते.

बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स मार्गदर्शन करणार

लहान मुलांना होणारा कोरोनाचा संभाव्य धोका रोखण्यासाठी राज्यातील बालरोग तज्ज्ञांना सहभागी करून घेण्याचे प्रयत्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आहेत. गेल्या दोन आठवड्यांमध्ये त्यांनी मुंबईसह राज्यातील डॉक्टर्सशी संवाद साधला आहे. त्याप्रमाणे रविवार २३ मे रोजी दुपारी १२ वाजता राज्यातील बालरोग तज्ज्ञांसाठी समाजमाध्यमांवर एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात राज्याच्या बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्समधील तज्ज्ञ डॉक्टर्स संवाद साधणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील मार्गदर्शन करणार आहेत. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली असून या लाटेत लहान मुलांना जास्त धोका संभवण्याची शक्यता आहे. या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राज्यात बालरोग् तज्ज्ञांची टास्क फोर्स स्थापन करण्यात आली आहे. डॉ. सुहास प्रभू हे या टास्क फोर्सचे अध्यक्ष असून डॉ. विजय येवले, डॉ. परमानंद आंदणकर हे सदस्य आहेत.

हा कार्यक्रम 23 मे रोजी दुपारी 12 पासून मुख्यमंत्र्यांच्या सोशल मीडियावर फेसबुक

Facebook – https://www.facebook.com/CMOMaharashtra

आणि युट्यूब

Youtube- https://www.youtube.com/channel/UCjCKXS5a7qk446ro9ExD4hQ येथे थेट पाहता येणार आहे. या कार्यक्रमात राज्यातील अधिकाधिक बाल रोग तज्ज्ञांनी ऑनलाईन लिंकद्वारे सहभागी व्हावे, असे आवाहन बालरोग तज्ज्ञ संघटनेचे महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. जयंत पांढरीकर यांनी देखील केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.