‘कोरोना साधारण ताप’ म्हणणारा ‘तो’ डॉक्टर खरचं नायर रुग्णालयाचा अधिष्ठाता आहे का?

130

देशात ओमायक्रॉन विषाणूच्या वाढत्या फैलावाने भीतीचे वातावरण असताना मास्क घालू नका, सामाजिक अंतराचे पालन करू नका, असा संदेश देणाऱ्या व्हिडिओने खळबळ माजवली आहे. या व्हिडिओतील माहिती आणि संबंधित डॉक्टराची नमूद करण्यात आलेली ओळख खोटी असल्याचा उलगडा खुद्द नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले आहे.

व्हिडिओतील दावा

व्हिडिओ एका रुग्णालयातील परिसरात चित्रित करण्यात आला आहे. प्रसारमाध्यमांच्या गराड्यात डॉ. अजित कोठारी यांनी तोंडावर मास्क न घालता हिंदी भाषेत कोरोनाचे कोणतेही नियम न पाळण्याचा सल्ला दिला आहे. डॉ. अजित कोठारी सांगतात की, देशाचे राष्ट्रपती सांगो अथवा पंतप्रधान सांगो कोणीही तोंडावर मास्क घालू नका. मास्कच्या सततच्या वापरामुळे नवे आजार जडण्याची शक्यता आहे. शिवाय श्वसनाचा त्रास वाढेल, शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होईल. तुम्हाला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ येईल. वेळेवर उपचार न मिळाल्यास मृत्यू ओढावेल. मात्र रुग्ण कोरोनामुळे गेला, अशी नोंद केली जाईल. मास्क तोंडाला लावू नका. हा साधा तापाचा फ्लू आहे. यासह लसीकरणामुळे मृत्यूला आमंत्रण आपण देत आहोत. ही माहिती सरकार आपल्यापासून लपवत असल्याचेही डॉ. अजित कोठारी म्हणाले. दिल्लीतील लाल किल्ला येथे देशवासीयांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या भाषणाचा उल्लेख डॉ. कोठारी यांनी आपल्या भाषणात केला. या आजारामुळे मृत्यू होत असल्याचा मोदी यांचा सूचक इशारा हा लसीकरणाच्या माध्यामातून जात असल्याचे डॉ. कोठारी यांनी सांगितले.

(हेही वाचा इटलीहून आलेले आणखी एक विमान निघाले ‘कोरोना बॉम्ब’)

काय म्हणाले नायर रुग्णालयाचे ‘खरे’ अधिष्ठाता…

हा व्हिडिओ मुंबईतील पालिकेच्या मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयातील असून, व्हिडिओत मास्क न घालणाऱ्या डॉ. अजित कोठारी नायर रुग्णालयातील अधिष्ठाता असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ‘नायर रुग्णालयाचा अधिष्ठाता मी आहे. या व्हिडिओतील डॉ. अजित कोठारी नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता नाहीत, अशी माहिती डॉ. रमेश भारमल यांनी दिली. कोरोनाची लाट यशस्वीरित्या ओसरण्यासाठी कोरोना या संसर्गजन्य आजाराचा फैलाव नियंत्रणात हवा. त्यासाठी तोंडावर मास्क घालणे जरुरी आहे. लोकांनी सामाजिक अंतरही पाळायला हवे. सरकारने जारी केलेली कोरोनाशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वे आपण सर्वांनी पाळायला हवीत’, असे सांगत लसीकरणाचा सर्व नागरिकांना सल्लाही दिला.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.