जगभरात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी झाला आहे. पण चीनमध्ये (China) कोरोनाचा उद्रेक सुरु आहे. कोरानामुळे लाखो लोकांना घरात कैद करण्यात आलं आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार चीनची राजधानी बीजिंगमध्ये (Beijing) जवळपास 70 टक्के जनता कोविडच्या (Covid-19) विळख्यात अडकली आहे. वेगाने कोरोनाचा प्रसार होत आहे. चीनचे तज्ज्ञ वू जुन्यो यांनी पुढच्या तीन महिन्यात कोरोनाच्या तीन लाटा येण्याची भीती व्यक्त केली आहे. त्यामुळे भारत सरकार सतर्क झाले आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातील सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्यांना पत्र लिहून खबरदारीच्या सूचना केल्या आहे.
काय म्हणतात सचिव राजेश भूषण?
- चीन सध्या पहिल्या लाटेचा सामना करत आहे. 15 जानेवारीच्या आसपास कोरोनाचा कहर आणखी वाढू शकतो. 21 जानेवारीला चीनचा लूनार न्यू इयरला सुरुवात होत आहे, यावेळी लोक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडतील. यानंतर दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. तर फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तिसरी लाटेची शक्यात तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
- त्यामुळे भारतीयांनी चाचणी-शोधणे-उपचार-लसीकरण आणि कोविड योग्य वर्तन या पंचसूत्रीचे योग्यप्रकारे पालन होईल याकडे लक्ष द्यावे. सध्या भारतात आठवड्याला कोरोनाचे सुमारे बाराशे प्रकरणे आढळत आहेत. तर जगात दर आठवड्याला सुमारे पस्तीस लाख प्रकरणे नोंदवली जात आहेत.
- केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जून, 2022 मध्ये जारी केलेल्या ‘COVID-19 च्या संदर्भात मार्गदर्शन तत्वांमध्ये सुधारणा करून संशयित आणि पुष्टी झालेल्या प्रकरणांचा लवकर शोध, विलगीकरण, चाचणी आणि वेळेवर व्यवस्थापन करणे याचा समावेश करण्यात आला आहे.
- जपान, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, कोरिया, ब्राझील आणि चीनमध्ये अचानक वाढलेली प्रकरणे पाहता, भारपाटील कोरोना प्रकारांचा मागोवा घेण्यासाठी सकारात्मक प्रकरणातील नमुन्यांचा जीनोम सिक्वेन्स तयार करणे आवश्यक आहे. या संदर्भात, सर्व राज्यांना विनंती करण्यात आली आहे की, सर्व सकारात्मक प्रकरणांचे शक्य तितके नमुने, दररोज, नियुक्त केलेल्या INSACOG जीनोम सिक्वेन्सिंग लॅबोरेटरीज (IGSLS) कडे पाठवले जातील याकडे लक्ष द्यावे.