महिनाभरापासून सुरु असलेल्या हरिद्वार येथील कुंभमेळ्यात आता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला असून दिवसागणिक कोरोना संक्रमित रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे पंचायती आखाडा श्री निरंजनी यांनी त्यांच्यासाठी कुंभमेळा संपल्याचे जाहीर केले आहे. १७ एप्रिलपर्यंत आखाड्याचा मंडप रिकामा केला जाईल, असे आखाड्याच्या वतीने घोषित करण्यात आले आहे.
अन्य आखाड्यांनी निर्णय घेण्याचे आवाहन!
या आखाड्याचे कुंभमेळा प्रभारी, सचिव महंत रवींद्रपुरी यांनी यासंबंधी माहिती देताना सांगितले कि, कुंभक्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होऊ लागला आहे. साधुसंत आणि भाविक या कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. त्यामुळे निरंजनी आखाड्याच्या साधुसंतांचे तंबू १७ एप्रिल रोजी रिकामे करण्यात येतील. अन्य आखाड्यांनीही असा निर्णय घ्यावा, असे आवाहनही महंत रवींद्रपुरी यांनी केले आहे.
(हेही वाचा : मुंबईकरांनो, पुढील १५ दिवस महत्वाचे : ऑक्सिजनचा पुरवठा कमी)
परिस्थिती पाहून २७ एप्रिल रोजीच्या स्नानाविषयी निर्णय!
आखाड्यात आयोजित कार्यक्रमात बोलताना महंत रवींद्रपुरी म्हणाले कि, हरिद्वारची स्थिती चांगली नाही. आखाड्यातील ज्या संतांना २७ एप्रिल रोजी स्नान करायचे असेल, तर ४० ते ५० संतांनी स्वतंत्रपणे पायी जावे. त्याचा निर्णय त्यांनी त्यावेळीची परिस्थिती पाहून घ्यावा, असेही ते म्हणाले. अन्य आखाड्यांनीही कोरोनाच्या प्रादुर्भावापासून वाचण्यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा. कोरोनापासून सुरक्षित राहणे ही पहिली प्राथमिकता आहे, असेही महंत रवींद्रपुरी म्हणाले.
Join Our WhatsApp Community