कोरोना नाय! मोडा इला हा!

लॉकडाऊनमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामस्थांच्या मनात कोरोनाबद्दल गैरसमज वाढीला लागले. लॉकडाउन हे कायमस्वरूपी करता येणं शक्य नाही किंवा हा संसर्गजन्य आजार कधीतरी होणार हे माहिती असून देखील जनजागृतीचा मार्ग थोडा भरकटलाच.

पैलाडच्या बाबल्याक खोकलो सुरु झालो. घसो खवखवाक लागलो. हात पाय मोडल्यासारखे झाले. बायकोन इचारल्यानं, “काय हो? नेमक्या काय होता हा?”, “काय नाय गो, वाईच मोडल्यासारख्या होता हा. पण तू जरा हळू इचार, गावभर बॉंब करू नको”. संध्याकाळी बाबलो डॉक्टरकडना जाऊन इलो. जरा बरा वाटला. त्येच्या बायकोकपण एकदा ताप इलो, ती पण डॉक्टरकडे जाऊन इली. दोघांक चार दिवसात जरा बरा वाटाक लागला. डॉक्टरांनी जास्त काय न बोलता घरात रवाक सांगितल्यानी. पण बाबलो, “माका काय नाय झा्ल्ला, मोडा काय नईन हा आमका, “असो म्हणत गावभर फिरलो. हळूहळू ह्या “मोडा” गावभर झाला. डॉक्टरकडे लायनी लागाक लागले. एकटो डॉक्टर तरी काय करतलो? आरोग्यसेवकान टेस्ट करण्याचो प्रयत्न केल्यानं, पण गावातली लोका जवळच येऊक तयार नाय, ती नाकात टेस्ट कीट घालूक काय कर्म देतली हत. जे पेशंट हॉस्पिटलात दाखल झाले त्यांची टेस्ट झाली. काहींची गावात पाठी लागान टेस्ट झाली. आरोग्ययंत्रणेसारखेच रिपोर्ट पण उशिरा म्हणजे 5 दिवसांनी इले. “तेव्हा कळला, “ह्या मोडा नाय, ह्यो तर कोरोना, चीनमधना इलेलो”. यात बऱ्याच जणांचो दुर्दैवी अंत झालो. कोणाचो बापूस, कोणाची आवस, कोणाचो भाव एकदा हॉस्पिटलात गेले ते इलेच नाय परत. गावात टेस्ट करण्यावरना दोन गट पडले. सगळी परिस्थिती बिघाडली. एवढा सगळा होऊन पण गावात कोनाकव इचारा, काय रे कोरोना आसा काय? तर, कायव सांगतत, पैशे काढण्याचे धंदे आणि काय? कोरोना नायच हा, अशी उत्तरा ऐकाक गावातली.

मालवणी भाषेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही कोविड परिस्थिती सांगण्याचे कारण हेच की सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या मार्च महिन्यापासून साधारण बऱ्याचशा गावात ही परिस्थिती होती. अजूनही आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नेमकं किती नुकसान झालं, हे सांगता येणं कठीण जरी असलं तरी तरुण मुलगा मुंबईला आणि म्हातारे आई -वडील गावी असलेल्या या जिल्ह्याला मोठा फटका बसला हे निश्चित. कोविडमुळे झालेल्या नुकसानाची नेमकी आकडेवारी जिल्ह्या प्रशासनाला देखील सांगता येणार नाही. गावातच ज्यांचा मृत्यू झाला त्यांचे अंत्यसंस्कार करताना मोठी कसरत करावी लागली. निसर्गाने हिरवी शाल पांघरलेल्या या जिल्ह्याला कोरोनाने इतक्या मोठया प्रमाणात विळखा घालण्यास अनेक घटक कारणीभूत आहेत.

(हेही वाचा : राज्यात निर्बंध शिथिल होणार?)

मोडा झाला हा

मालवणी मुलखात पाय इरइरतत्, पोटात परातता हा, कसातरी वाटता हा, पेटके भरतत, अंधारी येता थरमरीसारख्या होता, अनाची वासना होयत नाय, डोळ्यात किसपाट गेलासा वाटता, झोप येत नाय, नुसती तळमळी अशी डॉक्टरला आपली व्याधी सांगण्याची पद्धत. त्यात “मोडा”हा आजाराचा प्रकार कित्येक वर्षांपासून चालत आलेला आहे. हात, पाय वळणे, सर्दी, ताप हीच ह्या मालवणी मोड्याची लक्षणं. अगदी कोविड 19 शी साधर्म्य असणारी. हे “मोडा” आल्यावर धावशीचा पाला, लीम्बिनीचा पाला असे घरगुती उपचार काही वर्षांपूर्वी केले जायचे.काही जण डॉक्टरकडे जायचे आणि बरे व्हायचे. यावेळी देखील बऱ्याच जणांनी हा गैरसमज करून घेतला. त्यात काही जणांची ऑक्सिजन पातळी खालवल्यानंतर तारांबळ उडाली. मग त्यांना “कोरोना “कळला.

जनजागृतीची कमतरता

आता प्रशासन म्हणेल ग्रामीण भागात कोरोनाला पळवण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून घरोघरी जनजागृती केली. त्यांचं हे म्हणणं बरोबर असलं तरी, तुमची जनजागृती नेमकी कोणत्या स्वरूपाची होती? कोरोना होऊच नये म्हणून काय करावं? यावर आरोग्य यंत्रणेचा भर होता. झाला तर काय करावं? काय पाऊलं उचलावीत? मानसिक स्थिती काय असावी? हे कोणी सांगितलं त्या बिचाऱ्या ग्रामस्थांना? कोरोनाची भीती मनातून घालवण्याऐवजी ज्या पद्धतीने ग्रामपंचायत स्तरावर सुरवातीच्या काळात लॉकडाऊन करण्यात आलं, त्यातून ग्रामस्थांच्या मनात कोरोनाबद्दल गैरसमजच वाढीला लागले. लॉकडाउन हे कायमस्वरूपी करता येणं शक्य नाही किंवा हा संसर्गजन्य आजार कधीतरी होणार हे माहिती असून देखील जनजागृतीचा मार्ग थोडा भरकटलाच.

टीव्हीवर दाखवल्यानी

काही वर्षांपूर्वी सह्याद्री वाहिनी आणि दूरदर्शन दिसणाऱ्या गावात आता सर्व बातम्या देणारे चॅनेल दिसतात. रोज धडकणारी रुग्णांची संख्या, मृत्यूचे आकडे या यापलीकडे कोरोनाबद्दल काहीच माहिती मिळत नसल्याने गावात नागरिक बिथरून गेले. कोरोना झाला म्हणजे, आपलं काहीच खरं नाही अशी गैरसमजूत अनेकांनी करून घेतली. लसीबद्दल देखील गैरसमज वाढीस लागले. आता कुठे लस घेण्यासाठी लोकांची मानसिकता सकारात्मक होत आहे.

(हेही वाचा : मानवी आरोग्यापेक्षा धर्म मोठा नाही! बकरी ईदसाठी सवलत मागणाऱ्यांना न्यायालयाने सुनावले!)

गेलो की पुन्हा परत येत नाय

एकदा पेशंट ऍम्ब्युलन्समधून कोविड सेंटरला गेला की तो परत घरी येत नाही, अशीच धारणा जिल्ह्यात बऱ्याच लोकांची झाली. त्यामुळे बऱ्याच जणांनी घरीच राहणे पसंत केले. घरी राहिल्यावर प्राथमिक आरोग्य यंत्रणेचे सहकार्य असले तरी गाव पातळीवर लोकांच्या मनात आरोग्ययंत्रणेबद्दल विश्वास निर्माण करण्यात जिल्हा आणि राज्य स्तरावरील सरकारी आरोग्ययंत्रणा अपयशी ठरली.खासगी डॉक्टरकडे गेल्यावर आपल्याला बरं वाटेल या विश्वासाने ग्रामस्थांनी उपचार घेतले आणि बरेचजण बरे झाले. ज्यांनी रिपोर्ट काढला ते आयसोलेशनमध्ये होते. उरलेले संसर्गास कारणीभूत ठरले. जे बहुसंख्य रुग्ण बरे झाले ते त्यांच्या रोगप्रतिकारक शक्तीच्या जीवावर.

देशातील अनेक जिल्ह्यांची आणि गावांची हीच परिस्थिती असेल. सिंधुदुर्ग जिल्ह्याची परिस्थिती वेगळी नाही. पन्नाशीच्या वरच्या वयोगटातील नागरिकांची संख्या जास्त असलेल्या या जिल्ह्यात उद्योगधंदे आणि आरोग्ययंत्रणा यांची वानवा पहिल्यापासूनच. कोरोना काळात ती जास्त जाणवली. परिस्थिती पूर्ववत होईल हळूहळू पण यातून धडा घेणे आवश्यक आहे. यापुढे कोरोनासोबतच जगायचे असल्याने कोरोना होऊ नये म्हणून काय करावे? यापेक्षा, झाल्यावर काय करावे? कोरोनाची भीती कशी घालवावी? याबद्दल गावागावात, वाडीवस्त्यांवर जनजागृती करणे गरजेचे आहे. तसेच मोडकळीस आलेली आरोग्य यंत्रणा आपण सुधारू शकलो तर ह्या “मोड्या”तही आपण चांगलं आयुष्य जगू शकतो. तरच गावातील मोठाल्या घरांचा म्हातारा आधार काही वर्ष का होईना टिकून राहील.

                                                                    लेखक – रोशन ना. चिंचवलकर, मुक्त पत्रकार, सिंधुदुर्ग.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here