कोरोना रुग्ण वाढले, तरी मुंबईत तीन हजार खाटा रिक्त!

सध्‍याची रुग्‍णशय्यांची क्षमता वाढवून ती एकूण २० हजारापेक्षा जास्त इतकी करण्‍यात येत आहे. दर आठवड्याला टप्‍प्‍या-टप्‍प्‍याने ही संख्‍या वाढवण्‍यात येत आहे, असे आयुक्त इक्बालसिंह चहल म्हणाले.

80

सद्यस्थितीत मुंबईत कोविड रुग्‍णांसाठी राखीव असलेल्‍या रुग्‍णशय्यांपैकी सुमारे ३ हजार रुग्‍णशय्या रिक्‍त आहेत. यात खासगी रुग्‍णालयातील ४५० बेडचाही समावेश आहे. थोडक्‍यात रुग्‍णशय्यांची कोणतीही कमतरता नाही. यापुढेही कमतरता भासणार नाही, याची सर्वतोपरी दक्षता महानगरपालिका प्रशासन घेत असून नागरिकांनी घाबरुन जावू नये, असे आवाहन महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी केले. तसेच रुग्‍णांनी व त्‍यांच्‍या नातेवाईकांनी आपापल्‍या विभागातील वॉर्ड वॉर रुमशी संपर्क साधल्यास त्‍यांना आवश्‍यकतेनुसार बेड पुरवला जाईल, असे आश्वासनही आयुक्तांनी केले आहे.

रुग्‍णांनी व नागरिकांनी घाबरुन जाऊ नये!

१० फेब्रुवारी २०२१ ते ३० मार्च २०२१ या ४८ दिवसांत एकूण ८५ हजार रुग्‍ण आढळले. यात ६९ हजार ५०० रुग्‍ण हे लक्षणे नसलेले आढळले. त्‍यांना घरी विलगीकरणात ठेवण्‍यात आले. उर्वरित १५ हजार ५०० रुग्‍णांना लक्षणे आढळली. त्‍यातही ८ हजार जणांनाच रुग्‍णालयात दाखल करावे लागले. इतरांना सौम्‍य लक्षणे असल्‍याने औषधोपचाराने ते बरे झाले आहेत. महानगरपालिकेच्‍या जम्‍बो कोविड सेंटर्स तसेच खासगी रुग्‍णालयात ८० टक्‍के रुग्‍णशय्या पुन्‍हा कोविड रुग्‍णांसाठी सक्रिय केल्‍या जात आहेत, असे सांगून महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी, मुंबईत १० फेब्रुवारी २०२१ रोजी ३ हजार ५०० इतकी रुग्‍णशय्या व्‍याप्‍ती होती. तर आता ९ हजार ९०० रुग्‍णशय्यांवर रुग्‍ण आहेत. पैकी ८ हजार ४०० मुंबईतील तर १ हजार ५०० मुंबई महानगर प्रदेशातील आहेत. याचाच अर्थ मागील ४८ दिवसांत एकूण बाधितांच्‍या संख्‍येच्‍या तुलनेत फक्‍त ५ हजार बेड रुग्‍णांसाठी आवश्‍यक भासले. म्‍हणून रुग्‍णांनी व नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन आयुक्‍तांनी केले.

(हेही वाचा : मुंबईतील दैनंदिन रुग्ण संख्या १० हजारांवर होणार! महापालिका आयुक्तांचा अंदाज)

रुग्‍णशय्यांची क्षमता वाढवून ती २० हजारापेक्षा जास्त करण्‍यात येणार!

सध्‍याची रुग्‍णशय्यांची क्षमता वाढवून ती एकूण २० हजारापेक्षा जास्त इतकी करण्‍यात येत आहे.  दर आठवड्याला टप्‍प्‍या-टप्‍प्‍याने याप्रमाणे ही संख्‍या वाढवण्‍यात येत आहे. जून ते नोव्‍हेंबर २०२० या कालावधीत महानगरपालिकेकडे ताब्‍यात असलेली खासगी लहान रुग्‍णालयांची सुमारे २ हजार २६९ रुग्‍णशय्या क्षमता महानगरपालिकेने आता पुन्‍हा ताब्‍यात घेतली आहे. ‍यामध्‍ये ३६० अतिदक्षता उपचारांसाठी आहेत. मुंबईतील ३५ मोठ्या रुग्‍णालयांमध्‍ये मिळून ४ हजार ८०० बेड कोविड रुग्‍णांच्‍या उपचारांसाठी उपलब्‍ध होते. कोविड संसर्ग मध्‍यंतरी नियंत्रणात आल्‍यानंतर सर्व मिळून २ हजार ३५० रुग्‍णशय्या इतर आजारांवरील उपचारांसाठी उपलब्‍ध करुन देण्‍यात आले होते. संसर्ग वाढत असल्‍याने आता पुन्‍हा ४ हजार ८०० ही मूळ कोविड रुग्‍णशय्या क्षमता गाठण्‍याच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या आहेत. म्‍हणजेच, लहान व मोठे खासगी रुग्‍णालये मिळून ७ हजार रुग्‍णशय्या कोविड रुग्‍णांसाठी उपलब्‍ध होतील, असे आयुक्‍तांनी स्‍पष्‍ट केले.

 बेड टप्‍प्‍या-टप्‍प्‍याने कार्यान्‍व‍ित केले जातील!

बीकेसी कोविड सेंटर टप्‍पा २ मध्‍ये सुमारे ७५० तर गोरेगांव येथील नेस्‍को कोविड सेंटरमध्‍ये १ हजार याप्रमाणे रुग्‍णशय्या उपलब्‍ध करुन देण्‍यात येत आहेत. नेस्‍कोची क्षमता ३ हजार रुग्‍णशय्यांची असून सध्‍या १ हजार बेड उपलब्‍ध आहेत. बीकेसीमध्‍ये २,१०० बेड क्षमता असून सध्‍या १ हजार बेड उपलब्‍ध आहेत. रिचर्डसन क्रूडास कोविड सेंटरमध्‍ये ७०० बेड उपलब्‍ध करुन देण्‍यात येणार आहेत. फक्‍त जम्‍बो सेंटर्सचा विचार करता एकूण ९ हजार रुग्‍णशय्या उपलब्‍ध असतील. सर्व सरकारी व खासगी रुग्‍णालये इत्‍यादी मिळून सुमारे २० हजारापेक्षा जास्त रुग्‍णशय्या मुंबईमध्‍ये उपलब्‍ध राहणार असून हे सर्व बेड तयार आहेत. ते फक्‍त टप्‍प्‍या-टप्‍प्‍याने व मागणीनुसार कार्यान्‍व‍ित केले जातील, असेही चहल यांनी नमूद केले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.