कोरोना तुझा रंग ‘कोणता’? निगेटिव्ह असतानाही का दाखवले जाते ‘पॉझिटिव्ह’?

बोरीवली चारकोप आणि वरळी या दोन ठिकाणी अशा दोन घटना घडल्या आहेत की, प्रयोगशाळेच्या चुकीच्या अहवालामुळे चक्क नागरिकांना बाधित रुग्ण घोषित करुन त्यांच्या कुटुंबियांना १७ दिवस घरीच राहण्याची शिक्षा केली आहे.

91

मुंबईमध्ये सध्या कोरोनाबाधित रुणांची संख्या झपाट्याने वाढत असताना, आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. महापालिकेच्या माध्यमातून निवड करण्यात आलेल्या प्रयोगशाळेच्या घोळामुळे पुन्हा एकदा महापालिकेची प्रतिमा मलीन होऊ लागली आहे. चांगल्या प्रकारचे काम करुनही महापालिकेच्या यंत्रणांवरील लोकांचा विश्वास उडेल, अशाप्रकारच्या घटना घडत आहेत. बोरीवली चारकोप आणि वरळी या दोन ठिकाणी अशा दोन घटना घडल्या आहेत की, प्रयोगशाळेच्या चुकीच्या अहवालामुळे चक्क नागरिकांना बाधित रुग्ण घोषित करुन त्यांच्या कुटुंबियांना १७ दिवस घरीच राहण्याची शिक्षा केली आहे. हा सर्व प्रकार पाहता कोरोना तुझा रंग कोणता, असे म्हणण्याची वेळ मुंबईकरांवर आली आहे.

कोविड केंद्रांमधील रुग्ण खाटा रिकाम्या

मुंबईमध्ये मागील महिन्यापासून बाधित कोरोना रुग्णांची संख्या प्रत्येक दिवशी नऊ ते दहा हजाराच्या घरात जात आहे. या वाढत्या रुग्ण संख्येमुळे मुंबई महापालिकेच्या आरोग्य व्यवस्थेवर ताण पडू लागला आहे. महापालिकेच्यावतीने कोविड केअर रुग्णालये तसेच, केंद्रं उभारली जात असली, तरी मागील महिन्यापासून खाजगी रुग्णालयांना पहिली पसंती दिली जात आहे. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांसह कोविड केंद्रांमधील अनेक रुग्ण खाटा या रिकाम्या पडल्या आहेत.

(हेही वाचाः ‘वसुली’साठी काय पण… क्लीन-अप कडून कसे पूर्ण केले जाते ‘टार्गेट’? वाचा…)

कोणाचा रिपोर्ट खरा?

एकीकडे रुग्ण संख्या वाढत असली, तरी महापालिकेने निवड केलेल्या खाजगी लॅबच्या चुकीच्या अहवालामुळे सध्या महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वरळीतील अॅनी बेझंट मार्गावरील एका इमारतीत राहणाऱ्या एका ११ वर्षीय मुलीची कोरोना चाचणी ३ एप्रिल रोजी थायरो केअर या प्रयोगशाळेत करण्यात आली. त्यानंतर त्या मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह दाखवण्यात आला. त्यामुळे महापालिकेने या मुलीच्या कुटुंबाला १७ दिवस होम क्वारंटाईन राहण्याच्या सूचना केल्या. पण त्यानंतर ५ एप्रिल रोजी या मुलीची चाचणी एन. एम. या प्रयोगशाळेत करण्यात आली. त्यामध्ये या मुलीचा अहवाल चक्क निगेटिव्ह दाखवण्यात आला.

(हेही वाचाः होम क्वारंटाईन १७ दिवसांचे!)

त्यामुळे मुलीच्या कुटुंबियांनी महापालिकेकडे विचारणा करताना, हा निगेटिव्ह अहवाल दाखवण्याचा प्रयत्न केला. पण महापालिकेने यापूर्वी पॉझिटिव्ह असल्याने होम क्वारंटाईन केले आहे त्यामुळे पुढील प्रक्रिया ही तशीच राहील, असे सांगत त्या कुटुंबाला होम क्वारंटाईन केले. त्यामुळे नातेवाईकांनाच आता प्रश्न पडला आहे की, नक्की कुठल्या लॅबचा अहवाल महापालिका ग्राह्य मानते. एन.एम. ही लॅब विश्वासार्ह असून त्या लॅबचे अहवाल सर्व नामांकित रुग्णालयांमध्ये स्वीकारले जातात. मग महापालिका त्या लॅबच्या अहवालाला का नाकारते, असा प्रश्न आता विचारला जात आहे.

रुग्णाला मिळत नाही कोविडचा अहवाल

दुसरी घटना बोरीवली चारकोप परिसरातील आहे. चारकोप सेक्टर पाच मध्ये राहणाऱ्या ४३ वर्षीय व्यक्तीची अँटीजेन चाचणी महापालिकेच्या चारकोप आरोग्य केंद्राच्या माध्यमातून करण्यात आली. लाईफ केअर डायग्नोस्टिकच्या मदतीने केलेल्या चाचणीचा अहवाल ५ एप्रिल रोजी निगेटिव्ह आला. पण त्यानंतर १२ एप्रिल रोजी महापालिकेच्याा आरोग्य सेविका त्यांच्या घरी येऊन त्यांना तुम्ही पॉझिटिव्ह असल्याचा निरोप देतात आणि त्यांना १७ दिवस होम क्वारंटाईन राहण्याच्या सूचना करतात. आपला अहवाल निगेटिव्ह असून, जर पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला तो अहवाल देण्यात यावा, अशी सूचना संबधित संशयित रुग्णाने केली. पण आजतागायत ना आरोग्य सेविका त्यांना हा अहवाल प्राप्त करुन देत, ना त्यांचे वरिष्ठ. याबाबत आरोग्य सेविकेच्या वरिष्ठांशी जेव्हा त्यांनी संपर्क साधला, तेव्हा त्यांनी संबंधित रुग्णाचा अहवाल सिस्टीमवर दिसत नाही. त्यामुळे आम्ही त्यांना तो देऊ शकत नाही, असे सांगितले.

(हेही वाचाः धक्कादायक! घरी परतणाऱ्या परप्रांतीयांना दिले बोगस कोरोना निगेटिव्ह अहवाल! )

नोकरीवर गदा येण्याची वेळ

जर मी कोविड पॉझिटिव्ह आहे तर माझा अहवाल द्या, मी महापालिकेला पूर्ण सहकार्य करायला तयार आहे आणि आजही आपल्या नियमांचे पालन करत आहे, असे तो रुग्ण सांगत आहे. पण महापालिकेचे अधिकारी त्यांना अहवाल अद्याप प्राप्त करुन देत नसून, या संशयित रुग्णाला आता कार्यालयात बोलावले असता, महापालिकेने क्वारंटाईन केल्यामुळे आपण येऊ शकत नाही असे त्यांनी सांगितले. पण पॉझिटिव्ह अहवाल नसल्यामुळे संबंधित संशयित रुग्णाला कार्यालय सुट्टी मंजूर करत नाही. त्यामुळे महापालिकेच्या चुकीच्या पध्दतीमुळे एका व्यक्तीला आपल्या नोकरीला मुकण्याची वेळ आली. आधीच लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत, त्यातच ते टिकवणे हे मोठे आव्हान आहे. निगेटिव्ह अहवाल असल्याने आता व्यक्तीला बिनपगारी सुट्टी म्हणून घरी राहावे लागणार आहे.

(हेही वाचाः लॉकडाऊनप्रमाणेच कडक निर्बंध!)

महापालिकेची बदनामी

त्यामुळे महापालिकेच्यावतीने निवड करण्यात येणाऱ्या प्रयोगशाळेच्या चुकीच्या अहवालामुळे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची मोठी अडचण होत असून, त्यांना नागरिकांच्याा रोषाला सामोरे जावे लागत आहे. महापालिकेच्या आरोग्य यंत्रणा जीव धोक्यात घालून काम करत असताना प्रयोगशाळेच्या चुकीच्या अहवालामुळे, महापालिकेची बदनामी मोठ्या प्रमाणात होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.