कोरोनाच्या संभाव्या तिसऱ्या लाटेसाठी महापालिका सज्ज! काय केली तयारी? वाचा…

प्रत्‍येक जम्‍बो कोविड सेंटरमध्‍ये द्रवरुप वैद्यकीय प्राणवायू साठवण टाक्‍या उपलब्‍ध आहेत. प्राणवायू सिलेंडर्स बॅकअपसह विविध रुग्णालयांमध्ये वातावरणातील हवेतून वैद्यकीय प्राणवायू उत्पादीत करणारी व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी मुंबई महापालिका सज्ज असून पूर्वीच्या ७ हजार ३०० खाटांमध्ये अजून ८ हजार ३५० खाटांची वाढ करत एकूण कोविड सेंटरमध्ये १५ हजार ६५० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यातील ७० टक्के खाटा या ऑक्सिजन वायू प्रणालीवर आधारीत असून तिसऱ्या लाटेला सामोरे जाताना लहान मुलांसाठीही स्वतंत्र असे कक्ष सर्व रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांसह जंबो कोविड सेंटरमध्ये सुरु करण्यात येत आहे. त्यामुळे लहान मुलांच्या उपचारात कोणतीही कमरता राहणार नसून यासाठी प्रत्येकाने लहान मुलांसह कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिका अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी केली आहे.

लहान मुलांची काळजी घेण्याचे आवाहन

मुंबईत कोविड-१९ विषाणू संसर्गाची पहिली व दुसरी लाट योग्‍यपणे थोपवून मुंबईकरांना सर्वोत्‍तम आरोग्‍य सुविधा देणाऱ्या मुंबई महानगरपालिकेने कोविड-१९ च्‍या संभाव्‍य तिसऱ्या लाटेचा सामना करण्‍यासाठी तयारी केली आहे. अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी दोन दिवस विभागातील पाहणी दौरे करुन या तयारीचा संपूर्ण आढावा घेतला आहे. विविध रुग्‍णालये व भव्‍य कोविड उपचार केंद्र (जम्बो सेंटर) तसेच कोरोना काळजी केंद्रे (सीसीसी) यातील रुग्णखाटा सुसज्ज करुन उपचारांसाठी उपलब्‍ध आहेत. महानगरपालिका प्रशासन पूर्व तयारीनिशी सुसज्‍ज होत असली तरी कोविड संसर्गाची तिसरी लाट येवू नये, यासाठी मुंबईकरांनी कोविड प्रतिबंधक सर्व सुचनांचे व मार्गदर्शक तत्‍वांचे पालन करावे, विशेषतः लहान मुलांची अधिक काळजी घ्‍यावी, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्‍यावतीने काकाणी यांनी केले आहे.

(हेही वाचा : सफाई कामगार वसाहतींच्या पुनर्विकास कंत्राटात घोटाळा!)

२ हजार जीवरक्षक प्रणाली अर्थात व्‍हेंटिलेटर रुग्ण खाटा आहेत!

कोविड विषाणू संसर्गाच्‍या संभाव्‍य तिसऱया लाटेच्या पार्श्वभूमीवर सुरेश काकाणी यांनी दोन दिवस महानगरपालिकेची विविध रुग्‍णालये तसेच समर्पित कोविड आरोग्‍य केंद्रांचा (जम्‍बो कोविड सेंटर्स) देखील पाहणी केली. या तयारीबद्दल समाधान व्‍यक्‍त करतानाच उर्वरित कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करुन सतर्क राहण्‍याचे निर्देशही आरोग्‍य यंत्रणेला त्‍यांनी दिले. या आढाव्‍याबाबत माहिती देताना ते म्‍हणाले की, महानगरपालिकेची विविध रुग्‍णालये, जम्‍बो कोविड सेंटर्स, कोरोना काळजी केंद्र १ (सीसीसी १), कोरोना काळजी केंद्र २ (सीसीसी २) यामध्‍ये कोविड बाधितांसाठी रुग्‍णखाटा सुसज्ज असून उपचारासाठी उपलब्‍ध आहेत. यामध्‍ये जवळपास २ हजार जीवरक्षक प्रणाली अर्थात व्‍हेंटिलेटर रुग्ण खाटा आहेत. वेगवेगळ्या जम्‍बो कोविड सेंटर्समध्‍ये पहिल्‍या टप्‍प्‍यामध्‍ये मिळून सुमारे ७ हजार ३०७ रुग्‍णशय्यांची क्षमता विकसित करण्‍यात आली. त्‍यावर जवळपास ७७ हजार रुग्‍णांवर उपचार करण्‍यात आले. आता जम्‍बो कोविड सेंटर्समध्‍ये दुसऱया टप्‍प्‍यामध्‍ये ८ हजार ३५० नवीन रुग्‍णशय्या क्षमता विकसित होण्‍याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. यात कांजूरमार्ग येथे २ हजार २००, मालाडमध्‍ये २ हजार २००, शीव येथे १ हजार २००, वरळी रेसकोर्स येथे ४५०, भायखळा येथील रिचर्डसन एण्‍ड क्रूडासमध्‍ये ७००, गोरेगांव नेस्‍को १ हजार ५००, वरळी एनएससीआय येथे १०० याप्रमाणे रुग्‍णशय्या क्षमता वाढवण्‍यात आली आहे. म्‍हणजेच जम्‍बो सेंटर्समधील रुग्‍णशय्या क्षमता एकूण १५ हजार ६५७ इतकी होत आहे. यातील ७० टक्‍के रुग्‍णशय्या या वाहिनीद्वारे प्राणवायू पुरवठा असणाऱया आहेत. प्रत्‍येक जम्‍बो कोविड सेंटरमध्‍ये द्रवरुप वैद्यकीय प्राणवायू साठवण टाक्‍या उपलब्‍ध आहेत. प्राणवायू सिलेंडर्स बॅकअपसह विविध रुग्णालयांमध्ये वातावरणातील हवेतून वैद्यकीय प्राणवायू उत्पादीत करणारी व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात येत आहे. त्‍यामुळे प्राणवायूची अडचण नाही, असे काकाणी यांनी स्पष्ट केले.

कोविडबाधित गरोदर मातांसाठी देखील स्वतंत्र कक्ष!

तिसऱ्या लाटेचा सामना करताना लहान मुलांची विशेष काळजी घेण्‍याच्‍या सूचना लक्षात घेता, महानगरपालिकेच्या प्रत्येक रुग्‍णालय, वैद्यकीय महाविद्यालयासह जम्‍बो कोविड सेंटर्समध्‍येही लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करण्‍यात येत आहे. कोविड-१९ संसर्गाच्‍या अनुषंगाने उपचारांबाबत मार्गदर्शन करण्‍यासाठी आतापर्यंत तीन वेळा बालरोग तज्‍ज्ञांची कार्यशाळा घेण्यात आली आहे. मुलांच्या उपचारांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही, याकडे विशेष लक्ष देत आहोत. तसेच, कोविडबाधित गरोदर मातांसाठी देखील स्वतंत्र कक्ष उभारण्‍यात आले असून त्‍यांची विशेष व्यवस्था केली जाणार आहे, असेही काकाणी यांनी यावेळी स्पष्ट केले. सद्यस्थितीत कोविडची दुसरी लाट ओसरली असली आणि कोविड प्रतिबंधक लसीकरण वेगाने सुरु असले तरी, सर्व मुंबईकर नागरिकांनी प्रतिबंधक नियमांचे योग्‍यरित्‍या पालन केले पाहिजे. लहान मुलांसह संपूर्ण कुटुंबाची योग्‍य काळजी घ्‍यावी, असे आवाहनही त्‍यांनी प्रशासनाच्‍यावतीने केले आहे. काकाणी यांनी मालाडमध्‍ये मुंबई विकास प्राधिकरणामार्फत नव्याने उभारण्यात येत असलेले कोविड केअर सेंटर, गोरेगाव जम्बो कोविड सेंटर, बी.के.सी. जम्बो कोविड सेंटर, दहिसर जम्बो कोविड सेंटर, कांजूरमार्ग कोविड सेंटर येथे भेट दिली. यावेळी उपायुक्त (परिमंडळ ७) विश्वास शंकरवार, उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) देवीदास क्षीरसागर, उपआयुक्त (भूसंपादन) अनिल वानखेडे, केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख, शीव रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी, अधिष्ठाता डॉ. प्रदीप आंग्रे, गोरेगाव नेस्को जम्‍बो कोविड सेंटरच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्रादे, बीकेसी कोविड सेंटरचे अधिष्ठाता डॉ. राजेश ढेरे यांच्‍यासह सहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर, अलका ससाणे, विभास आचरेकर, गजानन बेल्‍लाळे, सिडकोचे अधीक्षक रमेश गिरी व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

(हेही वाचा : ‘या’ सेलिब्रेटींनी दिले महापालिकेच्या रुग्णालयाला दोन व्हेंटिलेटर!)

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here