मुंबईत मागील काही दिवसांपासून कोविडबाधित रुग्णसंख्या वाढत असल्याने, संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, तिसऱ्या लाटेवर पुढील दहा दिवसांमध्ये शिक्कामोर्तब होणार आहे. बाधित रुग्णांची आकडेवारी पुढील आठ ते दहा दिवसांमध्ये वाढल्यास तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली असे विचारात घेऊन, कडक निर्बंध लागू करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील आठ ते दहा दिवस हे महत्वाचे असून त्यामध्ये बाधित रुग्णांची संख्या वाढल्यास तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली असे म्हणता येईल आणि तसे झाल्यास कडक निर्बंध लागू केले जाऊ शकतील,असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केले आहे.
पुढील आठ ते दहा दिवस महत्त्वाचे
मुंबईत सध्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात असतानाच, रुग्णांचाही आकडा वाढत जात आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी अनुक्रमे ४४१ व ४२२ रुग्ण आढळून आले आहेत. याबाबत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त(आरोग्य)सुरेश काकाणी यांच्याशी संवाद साधला असता, आतापासून काही सांगता येत नसले तरी पुढे जर अशीच रुग्ण संख्येची वाढ राहिली तर तिसऱ्या लाटेची सुरुवात झाली असे मानू ,असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या रुग्ण वाढत आहेत, ही रुग्णसंख्या अशीच वाढत राहिल्यास कडक निर्बंध आणावे लागतील, असे त्यांनी सांगितले. मुंबईत १६ ऑगस्ट २०२१ पासून सर्व खुले करण्यात आले. तेव्हापासून पुढील १४ दिवसांमध्ये काही तसे जास्त आढळून आले नसले तरी पुढील तारखेला रुग्णसंख्या वाढत आहे, ही वाढ अपेक्षितच होती. त्यामुळे पुढील आठ ते दहा दिवसांमधील रुग्णसंख्येवर महापालिकेचे विशेष लक्ष राहणार आहे.
(हेही वाचाः देव मंदिरातच नाही, तर रुग्णालयातही! मुख्यमंत्र्यांनी कुणाला सुनावले?)
बाहेरुन आलेल्या नागरिकांमुळे धोका
मुंबईत बाहेरुन लोक येत आहेत. कुणी परदेशातून तर कुणी अन्य राज्यांमधून आणि गावांमधून येत आहेत. आपल्याकडे स्थिती चांगली असली तरी ते कुठून आले आहेत, जिथून ते आले होते, तिथे कोविडबाधित होते का? त्यांची चाचणी केली होती का? याबाबत काही कल्पना नाही. बाहेरुन येण्याचा ओघ वाढल्यानेच आता ते एकप्रकारे कोरोनाचे वाहक बनत चालले आहेत, असा अंदाज आहे. आजवर ज्या काही कोविडबाधित रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत, त्यातील बाहेरुन आलेले बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या मुक्त वावरामुळे कुठेतरी रुग्णसंख्या अधिक वाढू नये याची पुढील दहा दिवसांमध्ये काळजी घेणे आवश्यक आहे. जर या कालावधीमध्ये रुग्ण संख्या वाढली नाही तर आपले शहर सुरक्षित आहे असे मानता येईल,असेही त्यांनी स्पष्ट केले.
उत्सवात काळजी घ्या
कुणालाही कोविडची लक्षणे आढळून आल्यास कुणीही त्याकडे दुर्लक्ष करू नये. महापालिकेच्यावतीने २६६ ठिकाणी मोफत कोविड चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत. याठिकाणी जाऊन लक्षणे असलेल्या व्यक्तीला चाचणी करता येईल. अशाप्रकारे चाचणी केल्यानंतर ते बाधित आढळून आल्यास त्यांच्यावर प्राथमिक स्तरातच उपचार करता येतील, असेही आवाहन त्यांनी केले आहे. पुढील १० दिवस उत्सवाचे आहेत, त्यामुळे गणेशोत्सव साजरा करताना कोविड नियमांचेही पालन करावे. जनतेने शक्यतो उत्सवाच्या काळात गर्दी टाळण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही काकाणी यांनी केले आहे.
(हेही वाचाः गणेशोत्सव मंडळांना या पुस्तिकेची माहिती आहे का?)
मागील गणेशोत्सवात वाढली होती रुग्णसंख्या
मागील वर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंत सरासरी ३० ते ३२ हजारांपर्यंत सीमित असलेली रुग्णसंख्या गणेशोत्सवानंतर म्हणजेच सप्टेंबर २०२०मध्ये एकाच महिन्यात ५७ हजारांवर पोहोचली होती. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात ही संख्या ५२ हजारांवर पोहोचली होती. त्यामुळे मागील वर्षी गणेशोत्सवामध्ये कोविडबाधित रुग्णांची वाढलेली रुग्णसंख्या लक्षात घेता आणि सध्याचे मुक्त असलेले वातावरण पाहता ही रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर पुढील आठ ते दहा दिवसांमध्ये रुग्णसंख्या वाढल्यास ऐन गणेशोत्सवामध्ये कडक निर्बंध लागू केले जाण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
Join Our WhatsApp Community