मुंबईत कोरोनाची तिसरी लाट आणली जाणार?

मुंबईत ‘आरटीपीसीआर’, ‘रॅपिड ऍण्टीजेन’ चाचणी वाढवण्यात येणार आहेत.

116

युरोप – अमेरिकेसह इतर काही देशांमध्ये ‘कोविड – १९’ या साथरोगाच्या तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कोविड विषयक वैद्यकीय चाचण्यांची संख्या अधिकाधिक वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये ‘आरटीपीसीआर’ चाचणी (RTPCR) व ‘रॅपिड ऍण्टीजेन’ चाचणी (RAT) या दोन्ही प्रकारच्या चाचण्यांचा समावेश असून कोविड या साथरोगाच्या प्रसारास अटकाव व्हावा, या उद्देशाने बाधित रुग्णामागे १५ व्यक्तींऐवजी २० व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात येणार आहे. त्यामुळे कोविडच्या वाढत्या चाचण्या आणि अतिसंपर्कातील लोकांची संख्या वाढवण्यावर भर दिला जाणार असल्याने संभाव्य लाट मुंबईत आणण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा जोरात सुरुवात झाली आहे.

महानगरपालिका प्रशासनाद्वारे सर्वस्तरीय नियोजन करण्यात येते

महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्या मार्गदर्शनात आणि अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या नेतृत्त्वात मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे सर्वस्तरीय कार्यवाही व नियोजन करण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने खाटांची उपलब्धतता वाढविणे, कोविड उपचार केंद्र व रुग्णालये इत्यादींची संख्या वाढविण्यासह ते अधिक सुसज्ज करणे, कोविड चाचण्यांची संख्या वाढविणे, प्रतिबंधित क्षेत्रांची अधिक प्रभावी अंमलबजावणी करणे इत्यादी बाबींचा समावेश आहे.

(हेही वाचा : बोगसगिरी करणाऱ्या नगरसेवकांकडून महापालिका 40 लाख वसूल करणार का?)

‘आरटीपीसीआर’, ‘रॅपिड ऍण्टीजेन’ चाचण्या वाढवणार!

यासंदर्भात माहिती देताना अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी सांगितले की, आता हळूहळू व टप्प्याटप्प्याने व्यवसाय विषयक आणि अर्थकारण विषयक विविध बाबी पुन्हा सुरु होत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कोविड विषयक वैद्यकीय चाचण्यांची संख्या अधिकाधिक वाढविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये ‘आरटीपीसीआर’ चाचणी (RTPCR) व ‘रॅपिड ऍण्टीजेन’ चाचणी (RAT) या दोन्ही प्रकारच्या चाचण्यांचा समावेश आहे. या वैद्यकीय चाचणी सुविधा देणा-यांकडे आवश्यक तेवढ्या प्रमाणातील ‘किट’ ची उपलब्धतता असल्याची खातरजमा करण्याचे आणि संभाव्य आवश्यकता लक्षात घेऊन योग्य ते नियोजन व कार्यवाही करण्यात येत आहे. कोविड या साथरोगाच्या प्रसारास अटकाव व्हावा, या उद्देशाने कोविड बाधित रुग्णांच्या निकटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जाते. या अनुषंगाने प्रत्येक बाधित रुग्णामागे १५ व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात येत होते. हे प्रमाण वाढवून आता प्रत्येक रुग्णामागे २० व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात येणार आहे.

प्रतिबंधित क्षेत्र आणि बाधित रुग्णांचा पाठपुरावा :

प्रतिबंधित क्षेत्रांमधील बाधित रुग्ण आणि संशयित रुग्ण यांच्या स्तरावर अधिकाधिक प्रभावी व सातत्यपूर्ण पाठपुरावा नियमितपणे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विभागस्तरीय नियंत्रण कक्षांचा आढावा व प्रशिक्षण

कोविड विषयक व्यवस्थापन अधिक प्रभावी व अधिक सुयोग्यप्रकारे करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये विभागस्तरीय नियंत्रण कक्ष (वॉर्ड वार रुम) कार्यरत आहेत. तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर या नियंत्रण कक्षांचा आढावा घेण्यात येत आहे. त्याचबरोबर संभाव्य तिस-या लाटेदरम्यान लहान मुलांना संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेऊन या अनुषंगाने आवश्यक ते प्रशिक्षण देखील नियंत्रण कक्षांमध्ये कार्यरत असणा-यांना देण्यात येणार आहे.

(हेही वाचा : आरोग्यमंत्र्यांनी बंद केली शिक्षणमंत्र्यांची ‘शाळा’)

जम्बो कोविड रुग्णालये व कोविड उपचार केंद्र

मुंबई महानगरपालिकेने अल्पावधीत कार्यान्वित केलेली जम्बो कोविड रुग्णालये आणि कोविड उपचार केंद्र इत्यादी ठिकाणी असणा-या सोयी-सुविधा, वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक असणा-या बाबींचा पुरवठा, साफसफाई व स्वच्छता विषयक सेवा, खानपान सेवा इत्यादींबाबत देखील आढावा घेण्यात येत आहे. मुंबईत सध्या सरासरी ३० हजार कोविड चाचण्या करण्यात येत असून सरासरी २०० ते २५० कोविड बाधित रुग्ण आढळून येतात. परंतु या कोविड चाचण्यांची संख्या अधिक वाढवून अतिसंपर्कातील संशयित रुग्णांचीही संख्या वाढवल्यास मुंबईतील रुग्णांचा आकडा वाढला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईत ज्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे, ती लाट आता यामाध्यमातून आणली जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.